1 जानेवारीपासून शाळा सुरू करण्यासाठी तयारी
प्रतिनिधी/ बेळगाव
दहावी-बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत प्रशासनाने निर्णय जाहीर केला आहे. यामुळे नववर्षात शालेय जीवनाचा अंतिम टप्पा असणारे मिशन एसएसएलसी ऑफलाईन सुरू होणार आहे. मात्र सदर निर्णयाची अंमलबजावणी करताना पालकांचे संमतीपत्र आवश्यक आहे. यामुळे शिक्षण खात्याने हिरवा कंदील दाखविला असला तरी प्रत्यक्ष वर्ग चालू करताना विद्यार्थ्यांची उपस्थिती पालकांच्या संमतीपत्रावर ठरणार आहे.
2020-2021 या शैक्षणिक वर्षात कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष अडकून पडले होते. मात्र कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना पदवी महाविद्यालये सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटला असला तरी महाविद्यालयातील उपस्थिती मात्र अल्प आहे. पालकांचे संमतीपत्र आणि कोविड चाचणीची सक्ती यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन क्लासेसचा मार्ग धरला आहे. यामुळे एसएसएलसीचे वर्ग सुरू करताना पालकांचे संमतीपत्र महत्त्वाचे ठरणार आहे.
एसएसएलसी परीक्षेला बोर्डाची परीक्षा असल्याने शैक्षणिक वर्षाचे महत्त्व विचारात घेऊन अखेर जानेवारीपासून वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. मात्र यावेळी कोणत्याही विद्यार्थ्याला सक्ती करू नये, शिवाय पालकांच्या संमतीपत्राशिवाय प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. यामुळे शाळांनी आपली जबाबदारी ओळखून पूर्वतयारी सुरू केली आहे. प्रत्यक्ष वर्ग सुरू होण्यास केवळ आठ दिवसांचा कालावधी राहिला आहे. त्यामुळे शाळांची स्वच्छता, वर्गखोल्यांची रचना तसेच विद्यार्थी-पालकांशी संपर्क साधून पूर्वतयारी सुरू केली असल्याचे चित्र दिसून येत आहे.