प्रतिनिधी /बेळगाव
सोमवारपासून 9 वी ते 12 वीपर्यंतच्या वर्गांना सुरुवात होत आहे. ऑफलाईन वर्गांना सुरुवात होत असल्याने विद्यार्थ्यांना प्रवासासाठी बसपास गरजेचा आहे. मात्र, नवीन बसपास प्रकिया अद्याप सुरू झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने जुना बसपास व शुल्क पावती दाखवून प्रवास करण्याची मुभा दिली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीखातर परिवहनने हा निर्णय घेतला आहे.
दरवषी शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली की, परिवहनकडून विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात बसपास उपलब्ध व्हायचा. मात्र, मागील वर्षापासून कोरोनामुळे शाळा-महाविद्यालये बराच काळ बंद होती. त्यामुळे बसपासच्या कामालादेखील स्थगिती मिळाली. ध्रम्यान, नवीन बसपास पक्रिया सुरू होईपर्यंत विद्यार्थ्यांना जुना बसपास व शुल्क पावती दाखवून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे ऑफलाईन वर्गांना हजर राहणाऱया विद्यार्थ्यांना सोयीचे झाले आहे.
शासनाने 5 ते 6 महिन्यांच्या कालावधीनंतर नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा ते घर असा प्रवास करण्यासाठी बसपास गरजेचा आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी चालू शैक्षणिक वर्षातील शुल्क पावती आणि मागील वर्षी वितरित केलेला पास दाखवून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.