अखिलेश यादव यांची नवी घोषणा : लॅपटॉपचे वाटप करणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
उत्तरप्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी शनिवारी अनेक आश्वासनांची घोषणा केली आहे. राज्यात आमचा पक्ष सत्तेवर आल्यास विद्यार्थ्यांना लॅपटॉप पुरविण्याचे काम करू. तसेच उच्चशिक्षण प्राप्त करू इच्छिणाऱया विद्यार्थ्यांना विदेशात देखील पाठवू. विदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱया विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र निधीची व्यवस्था केली जाणार असल्याचे आश्वासन अखिलेश यांनी दिले आहे.
राज्यातील योगी आदित्यनाथ सरकार केवळ दुष्प्रचारावर चालले आहे. अत्तराच्या व्यापाऱयासोबतचे बनावट छायाचित्र प्रसारित करणारे भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्याविरोधात आम्ही तक्रार करणार आहोत असे अखिलेश यांनी म्हटले आहे.
योगी आदित्यनाथ यांचा शिक्षणाशी फारसा संबंध नाही. आम्ही निर्माण केलेल्या शाळा दाखवून ते स्वतःची पाठ थोपटवून घेत आहेत. राज्यात योगी सरकारच्या काळात आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाचे सरकार सत्तेवर येताच आम्ही जागतिक दर्जाची आरोग्य सुविधा निर्माण करण्याचे काम करू. आमची सत्ता येताच शेतकऱयांना मोफत सिंचनाची सुविधा प्राप्त करून दिली जाईल. भाजपच्या द्वेष फैलावणाऱया राजकारणावर करडी नजर ठेवण्याचे आवाहन निवडणूक आयोगाला करत असल्याचे अखिलेश म्हणाले.