नारायण नाईक यांचे आवाहन
वार्ताहर / पालये
आपले अंतरंग बळकट करून तंत्रज्ञानाचा विशेषतः मोबाईलच्या मोहजाळय़ात न अडकता परिश्रम करावेत, अभ्यास करावा. तसेच चिंतन करावे. मोबाईलचा अतिवापर घातक आहे. ज्ञान प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांचा उपयोग करावा, असे आवाहन पेडणे विकास परिषदेचे व्यवस्थापक नारायण नाईक यांनी केले.
मांद्रे येथील सप्तेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या व्यावसायिक शाखेच्या यशस्वी विद्यार्थ्यांसाठी आयोजित बक्षीस वितरणावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य रामदास केळकर, पालक वनिता गोसावी यांची उपस्थिती होती.
प्राचार्य केळकर यांनी वार्षिक अहवाल सादर केला. विद्यालयाच्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. संस्थेचे अध्यक्ष ऍड. खलप यांनी वाचनालयासाठी देणगीस्वरुपात दिलेल्या पुस्तकांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना नारायण नाईक, प्राचार्य केळकर, वनिता गोसावी यांच्या हस्ते भेटवस्तू तसेच रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. यात अकरावीच्या विद्यार्थिनी उमा सातार्डेकर, समृद्धी दाबोलकर, साक्षी पेडणेकर, श्रद्धा साळगावकर, आचल किनळेकर, सुशिला पालयेकर तसेच बारावीचे विद्यार्थी शुभम मांद्रेकर, हर्ष दाबोलकर, दत्तराज सावंत, मेघा धारगळकर, नमिता च्यारी, विशाखा गोसावी यांचा समावेश होता. व्यावसायिक शाखेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. स्वागत व प्रास्ताविक प्रा. बबिता भिवेशट यांनी केले. मान्यवरांचा परिचय प्रा. बर्नांडेट रॉड्रिग्स यांनी करून दिला, तर सूत्रसंचालन प्रा. अजय देसाई यांनी केले. आभारप्रदर्शन प्रा. स्नेहल नाईक यांनी केले, तर बक्षिसांचे वाचन प्रा. सुचिता पाटील यांनी केले.