मानवाधिकार आयोगाचा आदेश
प्रतिनिधी /पणजी
गत जानेवारी महिन्यात एनएसयुआयच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मानवाधिकार आयोगाने उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. दि. 2 मार्चपूर्वी त्याचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढत असतानाही गोवा विद्यापीठाने ऑफलाईन परीक्षा घेण्याचे ठरविले होते. त्या प्रकाराला सदर विद्यार्थ्यांनी जोरदार विरोध दर्शविला होता. तरीही विद्यापीठाकडून दखल घेण्यात येत नसल्याने तो प्रकार मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी म्हणून गत 8 जानेवारी रोजी सदर विद्यार्थी पणजी चर्च चौकातून आल्तिनो येथील मुख्यमंत्री निवासस्थानी जात होते. त्यावेळी तेथे तैनात पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला होता.
त्यासंबंधी एनएसयूआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी नंतर पोलीस तसेच मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीनुसार आयोगाने आता या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, असा आदेश पोलीस अधीक्षकांना दिला आहे.