तरुण भारत ‘कॉलेज कट्टा’च्या माध्यमातून मराठा मंडळच्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध
प्रतिनिधी / बेळगाव
कॉलेज म्हणजे नवे जग, आपले ध्येय ठरवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे दिवस… तसेच मौजमस्तीचेसुद्धा…. डोळय़ात फुलपंखी स्वप्ने घेऊन वावरणाऱया मराठा मंडळच्या विद्यार्थ्यांना तरुण भारतने ‘कॉलेज कट्टा’च्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि तब्बल दोन तास विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनीही याचा मनसोक्त आस्वाद घेतला.
दोन वर्षे कोरोनाने सर्वच कार्यक्रमांवर निर्बंध घातल्याने तरुणाईच्या उत्साहावर विरजण पडले होते. मात्र, कॉलेज कट्टाने किणये येथे मराठा मंडळच्या शंकरराव पाटील कॉलेजमध्ये कार्यक्रम केला आणि तरुणाई उत्साहाने सळसळली. हे व्यासपीठ केवळ मनोरंजनाचेच नाही तर कलागुणांचेसुद्धा आहे. याची सुरुवात क्रॉसिंग द ब्रिज या अनोख्या खेळाने झाली. दिलेल्या मॅटवरून चालताना पाय जमिनीवर लागता कामा नये, ही खेळाची अट होती आणि विद्यार्थ्यांनी मोठय़ा चुरशीने यामध्ये सहभाग घेतला. त्यानंतर चौकोनी कागदाची लांबी वाढवायची स्पर्धा झाली. त्यानेही स्पर्धकांसह उपस्थितांना आनंद दिला.
गायन आणि वाद्यवादन स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखविले. मात्र, वक्तृत्व स्पर्धेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण पद्धत यावर आपली मते मांडताना त्यांचा गोंधळ उडाला. सर्वच उपस्थितांसाठी गाणे ओळखण्याची स्पर्धा झाली. तसेच नृत्य स्पर्धाही झाली. मिमिक्रीने हास्याची लकेर उमटविली. रॅपीड फायरने या स्पर्धेची सांगता झाली.
तरुण भारत कॉलेज कट्टा या कार्यक्रमाला
ऍप्टेक एव्हिएशन ऍण्ड हॉस्पिटॅलिटी अकॅडमी व माणिकबाग सुझुकी यांचे प्रायोजकत्व लाभले तर लोकमान्य सोसायटीचे सहकार्य लाभले. यावेळी प्राचार्य रमेश गोडसे यांनी तरुण भारतच्या कार्यकारी संचालिका रोमा ठाकुर, पूजा ठाकुर यांना पुष्पगुच्छ दिले. तरुण भारततर्फे ऍप्टेकचे प्रकाश पाटील व माणिकबागचे रॉय दास, प्राचार्या रूपाली हरदी व प्रिया काळे यांना पुष्पगुच्छ देण्यात आले.
विद्यार्थ्यांनी मिळविली बक्षिसे
वॉरियर्स ग्रुप, प्रियांका, तुळसा, यल्लुताई, कौस्तुभ, इंद्रायणी, प्रज्ञा, किरण पाटील, ताई, ऋषिकेश, सृष्टी, शरद, गोविंद, प्राची या विद्यार्थ्यांनी बक्षिसे मिळविली. प्रा. तेजराज किंकर लिखित ‘तरुण भारत कॉलेज कट्टा’चे शीर्षक गीत सादर करणाऱया विद्यार्थिनीलासुद्धा बक्षीस देण्यात आले.