सीबीएसई अन् शिक्षण मंत्रालय घेणार निर्णय
नवी दिल्ली:
सीबीएसईच्या 10 वी आणि 12 वीच्या परिक्षेच्या तयारीसाठी एका संसदीय समितीने विद्यार्थ्यांना ‘बिग क्वेश्चन बँक’ देण्याची सल्ला शिक्षण मंत्रालयाला दिला आहे. कोरोना महामारीमुळे अपूर्ण राहिलेल्या शिक्षणाच्या भरपाईच्या उद्देशाने समितीने ही सूचना केली आहे. यंदा सीबीएसई बोर्ड परीक्षा 5 मे ते 10 जूनपर्यंत आयोजित होणार आहे. या शैक्षणिक सत्रात आपत्तीमुळे मोठा ‘लर्निंग गॅप’ राहू शकतो. महामारीदरम्यान ऑनलाईन वर्गाचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना घेता आलेला नाही. इंटरनेट आणि आवश्यक उपकरणांच्या अभावामुळे बहुतांश गरीब कुटुंबांशी संबंधित विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिल्याचे संसदीय समितीच्या अधिकाऱयांनी सांगितले आहे. समितीच्या सदस्यांनी गरीब कुटुंबांच्या मुलांसाठी ऑनलाईन वर्गांच्या व्यवहार्यतेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. शिक्षण मंत्रालयाने जाहिराती आणि अन्य माध्यमांद्वारे दूरदर्शन-आकाशवाणीवर विविध विषयांच्या शिक्षणाचे प्रसारण करण्याचा प्रचार करायला हवा होता, असे उद्गार समितीचे अध्यक्ष आणि भाजप खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी काढले आहेत. दूरदर्शन आणि आकाशवाणी इंटरनेटच्या तुलनेत अधिक किफायतशीर असून या दोन्ही माध्यमांचा देशभरात विस्तार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.