शिक्षण विभाग व युनिसेफचा पुढाकार
पोर्टलचे शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन
पुढे कोणते करिअर .. एका क्लिकवर माहिती
नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पोर्टल
विद्यार्थ्यांच्या ‘सरल आयडी’वरून होणार ओपन
प्रतिनिधी / झाराप:
दहावी-बारावीनंतर पुढे काय करायचे?, कोणते करिअर उपलब्ध आहे? विशिष्ट करिअरसाठी कोणत्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात?, याबरोबरच कोर्सचा कालावधी, शुल्क, शिष्यवृत्ती आदींबाबत माहिती आता ‘महाराष्ट्र करिअर पोर्टल’वर एकत्रित स्वरुपात उपलब्ध होणार आहे. राज्य शिक्षण विभाग, युनिसेफ व राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या एकत्रित सहकार्याने या पोर्टलचे ऑनलाईन उद्घाटन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
लवकरच ‘महा करिअर पोर्टल’ विद्यार्थ्यांसाठी खुले होणार आहे. नववी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी शाळेतील आपला सरल आयडी क्रमांक वापरून या करिअर दुनियेत मुक्त संचार करू शकणार आहेत. या पोर्टलचा उपयोग सुमारे 66 लाख विद्यार्थ्यांना होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली.
करिअर पोर्टलवर विविध अभ्यासक्रम, त्यांचा कालावधी, महाविद्यालये, कोर्सेसची फी, त्यासाठीच्या अत्यावश्यक असणाऱया प्रवेश पूर्व परीक्षा, विविध शिष्यवृत्त्या, उपलब्ध असणाऱया नोकरीच्या संधी आदींबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुमारे 500 अभ्यासक्रम, सुमारे 21 हजार व्यावसायिक संस्था व संबंधित महाविद्यालये यांची माहिती दिली असल्याचे राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी सांगितले.
युनिसेफच्यावतीने आतापर्यंत देशातील गुजरात, आंध्रप्रदेश, बिहार, झारखंड, जम्मू-काश्मीर, मध्यप्रदेश, राज्यस्थान या राज्यात यापूर्वीच करिअर पोर्टल सुरू करण्यात आली आहेत. मात्र, त्या-त्या राज्यातील विद्यार्थ्यांनाच त्यांचा विशिष्ट आयडी वापरून पोर्टलवर जाता येते. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाही आता महा करिअर पोर्टल ऍपवर जाण्यासाठी विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेतील त्यांचा सरल आयडी वापरून करिअर दुनियेत घरबसल्या प्रवेश करता येणार आहे.
ग्रामीण, डोंगराळ व विशिष्ट वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होताच त्वरित नोकरीची गरज असते. अशा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने कुटुंब लवकर स्वयंपूर्ण होणे गरजेचे असते. विद्यार्थ्यांच्या गरजा व त्यासाठीच्या संधी लक्षात घेऊन हे पोर्टल निर्माण केले असल्याचे युनिसेफ इंडियाचे शिक्षण विभागप्रमुख टेरी डुरियन यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना वा पुढील व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करताना विविध अडचणी असतात. विशेषत: आर्थिक बाब मोठी असते. अशावेळी शिष्यवृत्त्या कोणत्या आहेत, पैसे उभे करण्याचे कोणकोणते रितसर पर्याय आहेत, हेसुद्धा या पोर्टलवर असल्याचे डुरियन यांनी सांगितले.
कसे असेल पोर्टल
पोर्टलचे पूर्ण नाव ‘महा करिअर पोर्टल डॉट कॉम’ (Maha career portal.com) असे आहे. या पोर्टलवर जाण्यासाठी विद्यार्थ्याला युनिक आयडी म्हणून शाळेतील स्वत:चा सरल आयडी क्रमांक वापरायचा आहे. पासवर्ड म्हणून 123456 हा क्रमांक वापरायचा आहे. 27 मेनंतर सर्व लॉगिन्स क्रिएट होणार आहेत.
या पोर्टलवर विद्यार्थ्याला पर्सनल डॅशबोर्ड मिळणार आहे. यावरून विद्यार्थ्यांचा करिअर प्रवास कळणार आहे. यामध्ये चार प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहेत. विद्यार्थी कुठे शिकणार, कोणता कोर्स करणार, त्याची आवड कोणती, भाषा माध्यम असे प्रश्न असणार आहेत.
पुढे गेल्यावर चार पर्याय असून त्यामध्ये करिअर, महाविद्यालये व व्यावसायिक संस्था, प्रवेश परीक्षा व शिष्यवृत्त्या असे विभाग आहेत. त्यानंतर स्नॅप शॉर्ट पेजीस देण्यात आली असून त्या-त्या करिअरमधील आदर्श व्यक्तिमत्वे, करिअर डिटेलमध्ये कोणती कामे करावी लागणार आहे, क्षमता कोणत्या आवश्यक आहेत, अभियोग्यता कोणत्या महत्वाच्या आहेत, करिअर वाढ तसेच कोविडचा करिअरवर कोणता परिणाम होणार आहे. त्याचीही मिमांसा देण्यात आली आहे.
………………………………………………………………………
वैशिष्टय़े
500 च्या वर करिअर कोर्स
1145 विविध परीक्षांची माहिती
1200 शिष्यवृत्त्या
21 हजार महाविद्यालये व व्यावसायिक संस्था
14 देशांतील माहिती
…………………………………………………………………………….
करिअर निवडीसाठी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील सुमारे 417 शिक्षक-समुपदेशक मार्गदर्शन करणार आहेत. शासनाच्यावतीने त्यांची ‘मेंटॉर’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधुदुर्गातील सात शिक्षक समुपदेशक यासाठी कार्यरत आहेत. त्यामध्ये पुढील समुपदेशकांचा समावेश आहे. विवेक कळसुलकर (पोखरण हायस्कूल) मोबा-9420123845, सुभाष विणकर (हिर्लोक हायस्कूल) मोबा-8275663798, संजय सानप (खारेपाटण हायस्कूल) मोबा-9890017471, भीमराव येडगे (देवगड) मोबा-7741924986, सतीश गावकर (फणसगाव हायस्कूल) मोबा-9404396807, सचिन डोंबाळे (हरकूळ हायस्कूल) मोबा-9405258327, भाग्यविधाता वारंग (वालावल हायस्कूल) मोबा- 9423213240.