संसदेच्या स्वरूपात उभारलेली मनपाची प्रशासकीय इमारत सज्ज : महापौर, उपमहापौर, आयुक्तांसह विविध कक्षांचा समावेश
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेच्या मुख्य कार्यालयाची इमारत अपुरी पडू लागल्याने नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे. याठिकाणी महापौर, उपमहापौर, महापालिका आयुक्त आणि स्थायी समिती अध्यक्षांच्या चेंबरसह विविध कक्षांचा समावेश करण्यात आला आहे. संसदेच्या स्वरूपात उभारण्यात आलेली प्रशासकीय इमारत सज्ज झाली असून विद्युत रोषणाई केल्याने झगमगत आहे.
महापालिकेच्या मुख्य कार्यालयाची इमारत 2008 मध्ये उभारण्यात आली होती. पण शहराचा पसारा वाढला असून लोकसंख्यादेखील वाढली आहे. त्याचप्रमाणे आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठी विविध विभाग कार्यरत आहेत. याकरिता नोकरवर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेची मुख्य इमारत अपुरी पडू लागली आहे.
मनपाच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीला काही ठिकाणी गळती लागली आहे. तसेच विविध विभागांतील अधिकाऱयांना व कर्मचाऱयांना बसण्यासाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे सध्या स्थायी समिती अध्यक्षांचे चेंबर व सत्ताधारी-विरोधी गटाच्या कक्षांचा वापर केला जात आहे. अधिकाऱयांसह नगरसेवकांना देखील बसण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने महापालिका कार्यालय आवारात नवीन इमारत उभारण्यात आली आहे. संसदेच्या स्वरूपात ही इमारत उभारण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला होता. त्या मागील बाजूस ही इमारत उभारण्यात आली असून सर्व कामे पूर्ण झाली आहेत. अलीकडेच इमारतीच्या विद्युत रोषणाईचे काम देखील पूर्ण झाले असून विविधरंगी विद्युत दीपांनी ही इमारत झगमगत आहे. विद्युत रोषणाई करण्यात आल्याने प्रशासकीय इमारत जनतेचे लक्ष वेधत आहे.