राज्यपाल… राज्यपाल… खाली डोकं वर पाय
ऑनलाईन टीम / तरुण भारत
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला वादळी सुरुवात झाली असुन सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर अधिवेशनच्या काही दिवस आधीच जोरदार आरोप – प्रत्यारोप करत होते. आज पहिल्याच दिवशी या संघर्षाची झलक पहायला मिळाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या अभिभाषणावेळी सत्ताधारी आमदारांनी गदारोळ केल्यानंतर सभागृहाबाहेरच राष्ट्रवादीच्या आमदारांनी राज्यापालांविरोधात घोषणाबाजी केली. राज्यपालांचा विरोध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या संजय दौंड या आमदाराने खाली डोकं वर पाय करत चक्क शीर्षासन करुन राज्यपालांच्या कृतीचा अनोख्या पद्धतीने निषेध केला आहे. या मुळे सभागृहात वातावरण गोंधळाचं बनलं आहे.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांमुळे नाही तर सत्ताधाऱ्यांमुळेच सभागृहात गदारोळ झाल्याचं पहायला मिळालं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावेळी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी तुफान घोषणाबाजी केली. यामुळे राज्यपालांना आपलं अभिभाषण अवघ्या दोन मिनिटांमध्ये आटोपतं घ्यावं लागलं.
त्यामुळे विरोधकांनी देखील या प्रकाराचा निषेध करत सरकारवर टीका केली आहे. मात्र या प्रकारानंतर शिवसेनेच्या आमदारांनी विधानभवनाच्या आवारात राज्यापालांविरोधात घोषणाबाजी केली. यावेऴी आमदारांनी ‘राज्यपाल हटाव महाराष्ट्र बचाव’च्या घोषणा दिल्या. तसेच ‘राज्यपाल… राज्यपाल… खाली डोकं वर पाय,’ अशा घोषणाही यावेळी शिवसेना आमदारांनी दिल्या.