556 प्रश्न अतारांकीत तर 195 तारांकीत सरकारी व खासगी मिळून एकूण 10 विधेयके
प्रतिनिधी / पणजी
सोमवार दि. 25 जानेवारीपासून सुरू होणाऱया विधानसभा अधिवेशनासाठी 751 प्रश्न आले असून त्यात विविध महत्वाच्या विषयांचा समावेश आहे. पहिल्या दिवशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे अभिभाषण होणार असून त्यानंतर 27 ते 29 जानेवारी असे तीन दिवस त्यांच्या भाषणावर चर्चा होणार आहे.
सभापती राजेश पाटणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 25 ते 29 असा अधिवेशनाचा कालावधी असला तरी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन सुटी असल्यामुळे त्या दिवशी कामकाज होणार नाही. त्यामुळे एकूण चारच दिवस कामकाज होणार असून सहा सरकारी तर चार खासगी मिळून एकूण 10 विधेयके विधानसभेत मांडण्यात येणार आहेत. आलेल्या 751 प्रश्नांपैकी 556 प्रश्न अतारांकीत तर 195 प्रश्न हे तारांकीत करण्यात येणार आहेत.
काही महनीय व्यक्तींचे दुखवटय़ाचे ठरावही विधानसभेत येणार आहेत. शुक्रवारी खासगी कामकाजाचा दिवस असून आमदार एकूण 5 ठराव मांडणार आहेत. कोरोना संकटामुळे अधिवेशनाचा कालावधी मर्यादीत ठेवण्यात आला असून गॅलरीत दर्शकांना प्रवेश मिळणार नाही. अधिवेशनाची पुर्वतयारी करण्यात येत असून विधानसभा संकुलाची साफसफाई स्वच्छता चालू आहे.