आमदार, मंत्र्यांना कोरोनाची भीती : आचारसंहितेमुळे घोषणा करण्यातही अडचण
प्रतिनिधी / पणजी
राज्य विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या लेखानुदान मागण्यांना काल मंगळवारी आवाजी मतदानाने मंजुरी देण्यात आली. त्यानंतर अधिवेशन स्थगित करण्यात आले. हे अधिवेशन यानंतर दि. 19 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता सुरू होईल व सध्या स्थगित ठेवण्यात आलेले कामकाजच पुढे नेण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दि. 24 मार्च रोजी सुमारे 25 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला होता. त्यावर अधिवेशनाच्या पुढील कामकाजात चर्चा होणार होती. परंतु राज्यात कोरोनाचा संसर्ग सुसाट वेगाने वाढू लागला व एका आमदारास त्याची लागणही झाली. त्यामुळे अधिवेशन सध्या गुंडाळून ठेवावे, तत्पूर्वी पुढील तीन महिन्यासाठी लेखानुदान मागण्या मान्य कराव्या, अशी मागणी सत्ताधाऱयांसह विरोधी आमदारांनीही केली. कामकाज सल्लागार मंडळाच्या बैठकीत चार आमदारांनी सभापतींना तसे लेखी पत्रही सादर केले व लेखानुदान घेऊन अधिवेशन तात्पुरते स्थगित ठेवा, अशी मागणी केली होती.
दरम्यान, मंगळवारीच राज्य निवडणूक आयोगाने पाच पालिकांची निवडणूक जाहीर केल्याने त्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली. परिणामी कोणतीही घोषणा करण्यावर निर्बंध आले. घोषणा केल्यास तो आचारसंहितेचा भंग ठरण्याची शक्यता होती. त्याही कारणामुळे विधानसभेचे कामकाज चालविणे फार जिकीरीचे झाले होते.
विधानसभा स्थगित करण्यावर सर्वांचे एकमत झाले व पुढील तीन महिन्यांसाठी सुमारे 1043.98 कोटी रुपयांच्या लेखानुदान मागण्यांना मान्यता देण्यात आली. त्यानंतर सभापती राजेश पाटणेकर यांनी 19 जुलै सकाळी 11.30 पर्यंत अधिवेशन स्थगित करण्यात आल्याची घोषणा केली.