प्रतिनिधी/ मडगाव
कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर होणाऱया आगामी विधानसभा निवडणुकीत 80 वर्षावरील मतदारांना टपालद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीत रॉड्रिग्स यांनी दिली. या पूर्वी केवळ सरकारी कर्मचाऱयांनाच जे निवडणूक प्रक्रियेत भाग घेतात त्यांना टपालद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध केली जायची.
काल शनिवारी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीबरोबर सुधारित मतदानांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीत रॉड्रिग्स यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी टपाल मतदानांसदर्भातील सविस्तर माहिती दिली. त्याच बरोबर कोरोना महामारीत ज्या मतदारांचा बळी गेला, त्याची नावे मतदार यादीतून गाळणे, बोगस मतदार वगळणे, नव्याने नोंद झालेले मतदार यावर देखील चर्चा झाली.
मतदारांची यादी तयार करण्याचे काम 30 नोव्हेंबर पर्यंत चालणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. जानेवारी 2022 मध्ये मतदारांची अंतिम यादी तयार होणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणूक होणार असल्याने प्रत्येक बुथमध्ये एक हजारपेक्षा अधिक मतदार असणार नाहीत. जर गरज भासली तर बुथमध्ये वाढ केली जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. कालच्या या बैठकीला भाजपचे नवीन पै रायकर, काँग्रेसचे आल्तिन गोम्स व गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत उपस्थित होते. सध्या मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे ते समाधानकारक असून अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीत रोड्रिग्स हे योग्यरित्या काम करीत असल्याची प्रतिक्रिया नवीन पै रायकर व दुर्गादास कामत यांनी व्यक्त केली.