शिखविरोधी दंगलीप्रकरणी काँग्रेस नेत्याविरोधात आरोप निश्चित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंजाबमधील विधानसभा निवडणूक नजीक आली असतानाच दिल्लीतील एका न्यायालयाने काँग्रेस नेते सज्जन कुमार यांच्या विरोधात नोंद गुन्हय़ाप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाचा थेट प्रभाव पंजाबच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान दिसून येणार आहे. शिरोमणी अकाली दलाने हा मुद्दा आता उचलून धरला आहे. दिल्ली गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने याप्रकरणी काँग्रेसलाच आरोपीच्या पिंजऱयात उभे केले आहे.
सज्जन कुमार यांच्याविरोधात दिल्लीत दोन शीखधर्मीयांच्या हत्येप्रकरणी गुन्हे नोंद झाले होते. यासंबंधीच्या खटल्याची सुनावणी 16 डिसेंबर रोजी होणार आहे. सज्जन कुमार यापूर्वीच एका खटल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.
1984 च्या शीखविरोधी दंगलीला 37 वर्षे उलटल्यावरही न्यायाला विलंब होतोय. 37 वर्षांदरम्यान हे गुन्हे दडपण्याचा प्रयत्न झाला आणि विविध आयोग स्थापन करूनही न्याय मिळाला नव्हता. अकाली दलाच्या दबावामुळे केंद्र सरकारने नव्यान एसआयटी स्थापन केली आणि खटले पुन्हा सुरू करून सज्जन कुमार आणि अन्य दोषींना शिक्षा मिळू लागली आहे. सज्जन कुमार यांच्यानंतर जगदीश टायटलर आणि कमलनाथ यांनाही शिक्षा भोगावी लागणार असल्याचे उद्गार दिल्ली गुरुद्वारा समितीचे महासचिव हरमीत सिंह कालका यांनी काढले आहेत.
काँग्रेसने आतापर्यंत सज्जन कुमार, जगदीश टायटलर आणि कमलनाथ यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. या नेत्यांना अटक झाल्यास राजीव गांधी आणि गांधी कुटुंब हेच 1984 च्या नरसंहारास कारणीभूत असल्याचा खुलासा होणार असल्याचा दावा भाजप नेते मनजिंदर सिंह सिरसा यांनी केला.