वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आगामी गुजरात तसेच हिमाचल प्रदेशची विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून काँग्रेसने मंगळवारी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. गेहलोत यांची गुजरातसाठी वरिष्ठ पर्यवेक्षक म्हणून काँग्रेसने नियुक्ती केली आहे. तर सचिन पायलट यांना हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीसाठी पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
या नियुक्तींसंबंधी के.सी. वेणुगोपाल यांनी पक्षाच्या वतीने वक्तव्य प्रसिद्ध केले आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना हिमाचल प्रदेश निवडणुकीसाठी वरिष्ठ पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. याचबरोबर टीएस सिंह देव आणि मिलिंद देवरा यांना गुजरात निवडणुकीसाठी पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आले आहे. तर सचिन पायलट अन् पंजाबमधील नेते प्रताप सिंह बाजवा हे हिमाचल निवडणुकीसाठी पक्षाचे पर्यवेक्षक असतील.
गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. काँग्रेस या दोन्ही राज्यांमध्ये भाजपला सत्तेवरून दूर करत स्वतःचे सरकार स्थापन करू पाहत आहे. काँग्रेसने या दोन्ही राज्यांमध्ये सत्ता मिळविण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. या दोन्ही राज्यांमध्ये भाजप अन् काँग्रेसला आता आम आदमी पक्षाच्या आव्हानालाही सामोरे जावे लागणार आहे. आम आदमी पक्ष या राज्यांमध्ये काँग्रेसची जागा घेऊ पाहत असल्याचे मानले जाते.