उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत रालोदसोबत आघाडी
वृत्तसंस्था / लखनौ
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी घोषणा केली आहे. पुढील म्हणजेच 2022 ची विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचे त्यांनी मंगळवारी सांगितले आहे. उत्तरप्रदेशात पुढील वर्षाच्या प्रारंभी निवडणूक होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.
उत्तरप्रदेशच्या निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल यांच्यातील आघाडी निश्चित झाली आहे. केवळ जागावाटपावर चर्चा होणे शिल्लक असल्याचे अखिलेश यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले आहे. रालोदचे अध्यक्ष जयंत चौधरी हे रविवारी काँग्रेस महासचिव प्रियंका वड्रा यांना भेटले होते. तसेच प्रियंका यांच्यासाठीच्या चार्टर्ड विमानातूनच जयंत चौधरी यांनी दिल्ली गाठली होती. या भेटीनंतर उत्तरप्रदेशातील आघाडीची समीकरणे बदलणार असल्याचा कयास व्यक्त होत होता. या पार्श्वभूमीवर अखिलेश यांनी हे वक्तव्य केले आहे.
अखिलेश यादव सध्या आझमगढचे खासदार आहेत. तसेच ते उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत. तसेच अखिलेश यांनी विधान परिषदेचे सदस्य असताना राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले होते.
समाजवादी पक्षाच्या प्रचाराची धुरा पूर्णपणे त्यांना पेलावी लागणार आहे. मुलायम सिंह यादव यांची प्रकृती आता फारशी बरी नसल्याने तसेच काका शिवपाल यादव यांनी वेगळा पक्ष काढल्याने अखिलेश यांना राज्यभर प्रचारासाठी पोहोचावे लागणार आहे.
योग्य सन्मान करू
शिवपाल यादव यांचा प्रगतिशील समाजवादी पक्ष लोहिया (पीएसपीएल) विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षासोबत आघाडी करणार असा प्रश्न अखिलेश यांना विचारण्यात आला होता. आघाडीबद्दल मला कुठलीच समस्या नाही. शिवपाल आणि त्यांच्या सहकाऱयांना योग्य आदर देण्यात येणार असल्याचे अखिलेश म्हणाले.
जिन्नासंबंधी वक्तव्यावरून वाद
अखिलेश यादव यांनी रविवारी केलेल्या एका वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. अखिलेश यांनी मोहम्मद अली जिन्नांना महात्मा गांधी तसेच पंडित जवाहरलाल नेहरू तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्याप्रमाणे स्वातंत्र्यसैनिक ठरविले होते. या विधानाप्रकरणी भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यांचे विधान लाजिरवाणे असल्याचे म्हणत माफी मागण्यास सांगितले होते.