सोमवारपासून विधेयकांवर होणार चर्चा
प्रतिनिधी / बेंगळूर
गुरुवारपासून राज्य विधिमंडळ अधिवेशनाला प्रारंभ झाला असून शुक्रवारपासून खऱया अर्थाने कामकाजाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या दुसऱयाच दिवशी विधानसभेत सरकारकडून 11 विधेयके मांडण्यात आली आहेत. या विधेयकांवर 5 फेब्रुवारीपर्यंत चर्चा करून संमत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तर चर्चेची वेळ संपल्यानंतर सभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी विधेयके मांडण्याची मुभा दिली. 2020 मधील कर्नाटक लोकायुक्त (तिसरे) दुरुस्ती विधेयकासह एकूण 11 विधेयके सभागृहात मांडण्यात आली आहेत.
लोकायुक्त दुरुस्ती विधेयक त्याचप्रमाणे 2020 सालातील कर्नाटक पतपेढय़ांमधील गुंतवणूकदारांच्या हितरक्षणासाठीचे दुरुस्ती विधेयक मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी मांडले. त्यानंतर उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी सद्गुरु मुरुघराजेंद्र विद्यापीठ विधेयक, 2020 सालातील विद्याशिल्प विद्यापीठ विधेयक, एट्रीया विद्यापीठ विधेयक, 2021 सालातील बेंगळूर डॉ. बी. आर. आंबेडकर अर्थशास्त्र विद्यापीठ विधेयक मांडले.
तर गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी 2021 सालातील कर्नाटक पालिका आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयक, 2020 सालातील बागायत विज्ञान विद्यापीठ दुरुस्ती विधेयक मांडले. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री तथा परिवहनमंत्री लक्ष्मण सवदी यांच्यावतीने बसवराज बोम्माई यांनी 2020 सालातील कर्नाटक मोटार वाहन कर निर्धारण दुसरे दुरुस्ती विधेयक मांडले.
2020 सालातील कर्नाटक संसर्गजन्य रोग नियंत्रण दुरुस्ती विधेयक आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी मांडले. सोमवारपासून या विधेयकांवर चर्चा होणार आहे.