ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पहायला मिळाली. शिवसेनेचे आमदार यांनी सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्याने भाजपा आक्रमक झाली असून, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.
सभागृहात वीज कनेक्शन कापणीसंदर्भात चर्चा सुरू असताना राज्य सरकार 100 युनिटपर्यंत मोफत वीज देणार होते, ती दिली का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. त्यावर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांच्या खात्यात 15 लाख जमा करणार हेते, ते केले का? उसा उलट प्रश्न केला. यावेळी आक्रमक झालेल्या फडणवीस यांनी राऊतांना आव्हान दिले. मी आव्हान देतो की, नितीन राऊतांनी पंतप्रधानांनी असं म्हटल्याचं वाक्य आणून दाखवावं नाहीतर देशाची माफी मागावी. यावर बोलताना नितीन राऊतांनी 2014 च्या निवडणुकीत काळा पैसा भारतात परत आणून नागरिकांच्या खात्यात प्रत्येकी 15 लाख रुपये जमा करणार असल्याचे म्हटलं होतं, असं सांगितलं.
दरम्यान, भास्कर जाधव यांनी यात हस्तक्षेप करत मोदींची नक्कल केली. ‘काला धन लाने का के नहीं लाने का? तो लाने का.. लाने का तो कहाँ रखने का? यू ही रखने का’ असं ते बोलले आहेत”, असं भास्कर जाधव नक्कल करत सांगितले. त्यानंतर आक्रमक झालेल्या भाजपाने भास्कर जाधव यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.