भारतासाठी ठरणार मोठा धोका : इस्रायलच्या अभियंत्यांवर तंत्रज्ञान विक्री केल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ जेरूसलेम
इस्रायलकडून अब्जावधी डॉलर्सची अत्याधुनिक शस्त्रास्त्रs खरेदी करणाऱया भारताला मोठा झटका देणारा प्रकार उघडकीस आला आहे. इस्रायलच्या 20 अभियंत्यांच्या विरोधात एका आशियाई देशाला अत्यंत घातक आत्मघाती ड्रोन हारोपची तंत्रज्ञान विक्री केल्याचा आरोप झाला आहे. हा आशियाई देश चीनच असल्याचा दावा एका तज्ञाने केला आहे. भारतही हा ड्रोन इस्रायलकडून खरेदी करणार आहे.
हारोपचे तंत्रज्ञान विकल्याप्रकरणी 20 जणांच्या विरोधात चौकशी सुरू करण्यात आली आहे. या सर्वांवर आशियाई देशासाठी आर्म्ड लोटेरिंग ड्रोन क्षेपणास्त्र किंवा सुइसाइड ड्रोनचे अवैध मार्गाने डिझाइन तयार करणे, त्याचे उत्पादन करणे आणि विकण्याचा आरोप आहे. इस्रायलने स्वतःच्या विक्रीला धक्का पोहोचू नये म्हणून संबंधित देशाचे नाव उघड केलेले नाही.
पैसे अन् अन्य सुविधांच्या बदल्यात गुन्हा
संशयित अभियंत्यांना संबंधित देशाच्या कंपन्यांकडून गुप्तपणे निर्देश मिळत होते. या क्षेपणास्त्रांच्या बदल्यात इस्रायलच्या अधिकाऱयांना प्रचंड पैसा आणि अन्य सुविधा देण्यात आल्याचे इस्रायलच्या तपास यंत्रणेने म्हटले आहे. हारोप ड्रोनची निर्मिती इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीज ही कंपनी करत आहे.
युद्धात ब्रम्हास्त्र
हारोप ड्रोनद्वारेच अजरबैजानने आर्मेनियाला युद्धात गुडघे टेकण्यास भाग पाडले होते. हारोपसमोर आर्मेनियाची हवाई सुरक्षा यंत्रणा तसेच रणगाडे सपशेल अपयशी ठरले होते. सुइसाइड ड्रोनचे तंत्रज्ञान शत्रूंच्या हातात पोहोचू शकते अशी भीती इस्रायलच्या प्रसारमाध्यमांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी इस्रायल चीनला टेहळणी ड्रोन विकू पाहत होता, पण अमेरिकेने त्याला रोखले होते.
भारताला 15 हारोप मिळणार
हे तंत्रज्ञान खरोखरच चीनच्या हातात पडले असेल तर भारत आणि अमेरिकेसाठी मोठा धोका निर्माण होणार आहे. तर हे तंत्रज्ञान शत्रूदेश इराण आणि अमेरिकेचा शत्रू उत्तर कोरियाला प्राप्त होण्याची भीती इस्रायलला सतावू लागली आहे. 2019 मध्ये भारताने इस्रायलकडून 15 हारोप अटॅक ड्रोन खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताचे विशेष दल पूर्वीपासून या ड्रोनचा वापर करत आहे. यात एनएसजी आणि अन्य विशेष दलांचा समावेश आहे. पण सैन्यासाठी याच्या खरेदीवरून वाटाघाटी सध्या सुरू आहेत.
अत्यंत घातक
इस्रायली हारोप कामीकाझे ड्रोन्सला अनेक नावाने ओळखले जाते. याला हीरो-120 किंवा किलर ड्रोनही म्हटले जाते. इस्रायलच्या एअरोस्पेस क्षेत्राच्या एमबीटी डिव्हिजनने हा ड्रोन विकसित केला आहे. हे ड्रोनच एकप्रकारे क्षेपणास्त्र आहे. यातील अँटी-रडार होमिंग यंत्रणा शत्रूच्या रडारलाही निकामी करू शकते. या ड्रोनला एखादे लक्ष्य दिसल्यास ते स्वतःच जाऊन त्याला धडकते.