आज न्यायालयासमोर हजर करणार
प्रतिनिधी/ सातारा
सातारा तालुक्यातील एका शिक्षिकेच्या असहाय्यतेचा फायदा घेवून तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी करणाऱया सातारा पंचायत समितीतील गटशिक्षणाधिकारी संजय श्रीरंग धुमाळ (रा. गोडोली, सातारा) यांना अखेर सोमवारी अटक करण्यात आली. त्याच्यावर शनिवारी सातारा तालुका पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 5 ऑक्टोबर 2019 ते 17 जून 2021 या कालावधीत सातारा तालुक्यातील एका शाळेवर असलेल्या शिक्षिकेशी वेळोवेळी फोन करुन धुमाळ हे जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर कामावरुन त्रास देत तिच्याकडे एकटक पहात तिला तुमच्या घरी गाडीतून सोडतो. माझा तुला आधार होईल. यापुढे शाळेत तुला कसलाही त्रास होणार व तुझ्या विरुध्दच्या सर्व तक्रारी मी निकाली काढीन, त्या तक्रारी तू मला मिळावीस म्हणून मी मुद्दाम केल्या होत्या, असे सांगत असे.
त्यानंतर एकदा शिक्षिकेला आपण जवळ येवून म्हणत धुमाळ तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करु लागले. त्यावेळी शिक्षिकेने विरोध केला असता. तू शरीरसुखाला नाही म्हणू नकोस असे म्हणत मिठीत घेवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच आपल्या दोघात घडलेला प्रकार कोणाला सांगितलास तर तुझ्या शैक्षणिक कामाचा अहवाल खराब करुन तुझी नोकरी घालवीन, अशी धमकी दिल्याची तक्रार पीडित शिक्षिकेने सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर शनिवारी रात्री उशिरा धुमाळ यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. रविवारी ते त्यांच्या वकिलासह पोलीस ठाण्यात हजर झाले होते. मात्र, त्यावेळी त्यांच्या छातीत दुखू लागल्याचे त्यांनी सांगितल्याने पोलिसांनी त्यांना सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल केले होते.
सोमवारी दुपारी त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अटक करण्यात आली. उद्या मंगळवारी त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी दिली. या गुन्हय़ाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी तपास करत आहेत.