प्रतिनिधी / सातारा
लिंब, ता. सातारा येथील एका 23 वर्षीय विवाहितेचा विनयभंग तसेच तिच्या सासू, सासऱयास मारहाण, शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी गावातील दोन युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडीत विवाहितेने सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी लिंब, ता. सातारा येथे तक्रारदार विवाहिता तिच्या राहत्या घरी स्वयंपाक करत होती. त्यावेळी अजय यदू चव्हाण (उमट) रा. लिंब व गणेश बजरंग चव्हाण (मूळ रा. मेढा, ता. जावली, सध्या रा. लिंब) हे दोघे दारुच्या नशेत अनाधिकाराने घरात घुसले. त्यांनी विवाहितेचा हात पकडून वाईट हेतून जवळ ओढत मिठी मारली. तिचे तोंड घट्ट दाबून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
यावेळी विवाहितेचा आरडाओरडा ऐकून तिचे सासू, सासरे तिला सोडवण्यासाठी आला असताना त्यांना देखील या दोन युवकांनी दारुच्या नशेत शिवीगाळ, मारहाण सुरु केली. अंगणातील दगड उचलून कपाळावर मारल्याने सासरे जखमी झाले असून पीडित विवाहितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन युवकांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत हवालदार रजपूत पुढील तपास करत आहेत.