प्रतिनिधी/ बेळगाव
धारवाड जिल्हा पंचायत सदस्य योगीश गौडा खूनप्रकरणी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धतेत असलेल्या माजी मंत्री विनय कुलकर्णी यांची शनिवारी सकाळी कारागृहातून सुटका करण्यात आली. कारागृहाबाहेर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. चन्नम्मा सर्कलपर्यंत मिरवणूकही काढण्यात आली. कोविड नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तब्बल 9 महिन्यांनंतर शनिवार दि. 21 ऑगस्ट रोजी त्यांची सुटका झाली. सीबीआयने त्यांना अटक केली होती. 11 ऑगस्ट रोजी खूनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता तर 19 ऑगस्ट रोजी बेंगळूर येथील लोकप्रतिनिधींच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मोहरम सुटीमुळे आदेशाची प्रत वेळेत मिळाली नाही म्हणून एक दिवस त्यांच्या सुटकेला विलंब झाला.
शनिवारी सकाळी कारागृहातून त्यांची सुटका होताच बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी हुबळी-धारवाडसह विविध भागांतून आलेल्या त्यांच्या समर्थकांनी कारागृहाबाहेर गर्दी केली होती. चन्नम्मा सर्कलपर्यंत मिरवणूकही काढण्यात आली. आता जीवनात कसे वागावे, हे आपण शिकलो आहोत. कारागृहात खूप काही शिकायला मिळाले. आपल्याला वाचनाची आवड नव्हती. कारागृहात वाचायला शिकलो. या प्रकरणात आपली निर्दोष मुक्तता होईल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखविला.
दरम्यान कोविड नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून विनय कुलकर्णींसह 300 जणांविरुद्ध बेळगाव ग्रामीण पोलिसांनी स्वतःहून एफआयआर दाखल केला आहे. तर हिंडलगा ग्राम पंचायतीच्या अधिकाऱयांनीही विकेंड कर्फ्यूचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून फिर्याद दिली असून ही दोन्ही प्रकरणे नोंद करण्यात आली आहेत. कारागृहाबाहेर पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.