क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव बार असोसिएशन आयोजित चौथ्या ऍडव्होकेट प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत पावसामुळे बारूदवाले बुमर्स व विनय मांगलेकर वॉरियर्स यांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. कपिल वाळवेकर याला मालिकावीर तर पवन चौगुला यास उत्कृष्ट फलंदाज पुरस्काराने गौरविण्यात आले.
युनियन जिमखाना मैदानावर आयोजित या स्पर्धेत आदल्या दिवशीच्या राहिलेल्या सुपर ओव्हरच्या सामन्यात बुमर्स संघाने लायन्स संघाचा पराभव केला. चौथ्या सामन्यात लायन्सने 10 षटकात 7 बाद 74 धावा केल्या. त्याला उत्तर देताना बुमर्स संघाने 8 षटकात बिनबाद 75 धावा करून सामना 10 गडय़ांनी जिंकला. या सामन्यात कपिल वाळवेकरला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. पाचव्या सामन्यात लायन्स संघाने 10 षटकात 41 धावा केल्या. त्याला उत्तर देताना वॉरियर्स संघाने 4 षटकत 5 बाद 42 धावा करून सामना 5 गडय़ानी जिंकला. हरूण नदाफला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. शेवटच्या साखळी सामन्यात पँथर्सने 9.4 षटकात सर्व बाद 76 धावा केल्या. त्याला उत्तर देताना बुमर्सने 8.2 षटकात 4 बाद 77 धावा करून सामना 6 गडय़ानी जिंकला. अंतिम सामना बुमर्स व वॉरियर्स यांच्यात होणार होता. पण दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेवटी कमिटीने बारूदवाले बुमर्स व विनय मांगलेकर वॉरियर्स या दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्याचा निर्णय घेतला. बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे गजानन पाटील, आर. सी. पाटील, डी. एम. पाटील, आय. एम. पाटील, बी. एस. सुलतानपुरे, शिवपुत्र फटकळ, कमलेश मायण्णाचे, एम. बारूदवाले, विनय मांगलेकर, प्रशांत गौडर, लक्ष्मण पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते संयुक्त विजेत्या बारूदवाले बुमर्स व विनय मांगलेकर वॉरियर्स यांना चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज पवन चौगुला (बुमर्स), उत्कृष्ट गोलंदाज हेमराज बेंचण्णावर (बुमर्स), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुनील सक्री (वॉरियर्स), सर्वाधिक षटकार विभागून शिवाजी पाटील व शिवाजी शिंदे, सर्वाधिक झेल आशिष कट्टी (बुमर्स), कपिल वाळवेकर (बुमर्स) यांना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. यावेळी बबन भोबे यांनी मालिकावीरासाठी 501 रूपयाचे खास बक्षीस दिले. स्पर्धेसाठी पंच म्हणून नंदन शिंदे, प्रवीण हिरेमठ, पठाण, स्कोअरर म्हणून रवि कणबर्गी, डिजिटल स्कोअरर म्हणून सुजित शिंदोळकर यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन ऍड. सुधीर सक्री यांनी केले.