कोरोना काळातील वेतन अद्याप नाहीच
प्रतिनिधी/ बेळगाव
भावी विद्यार्थी घडविणारे शिक्षकच सध्या वेतनाविना काम करीत आहेत. विनाअनुदानित प्राध्यापक-शिक्षकांनी कोरोना काळात ऑनलाईन काम करूनही त्यांना वेतन देण्यात आलेले नाही. यामुळे या शिक्षकांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. आर्थिक चणचण जाणवत असल्याने अनेकांनी इतर व्यवसायही स्वीकारले आहेत. त्यामुळे शिक्षण खात्याने विनाअनुदानित शिक्षक व प्राध्यापकांना त्यांचा पगार मिळवून देण्याची मागणी करण्यात येत आहे.
बेळगावमध्ये अनेक संस्थांमध्ये प्राथमिक, माध्यमिक व पदवीपूर्व कॉलेजमध्ये अनेक शिक्षक विद्यादानाचे काम करीत आहेत. विनाअनुदानित संस्थाच त्या शिक्षकांना वेतन देत असते. या शिक्षकांना महिना 4 हजार रुपयांपासून पुढे वेतन देण्यात येते. परंतु कोरोना सुरू झाल्यापासून शाळा-कॉलेज बंद आहेत. याचेच कारण देत शिक्षकांना मागील 8 महिन्यांचा पगार अद्याप देण्यात आलेला नाही.
शिक्षकांची आर्थिक घडी बिघडली
विनाअनुदानित शिक्षकांना मागील मे महिन्यापासून पगार बंद आहे. काही संस्थांनी काही प्रमाणात पगार शिक्षकांना दिला असला तरी तो तुटपुंजा ठरत आहे. 8 महिने वेतनाविना राहावे लागले असल्याने शिक्षकांची आर्थिक घडी बिघडली आहे. घर-संसार कसा चालवायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. कोरोनाकाळात जरी शाळा-कॉलेज बंद असले तरी शिक्षकांचे ऑनलाईन शिक्षण सुरू होते. त्यामुळे या काळातील वेतन संस्थांनी लवकर जमा करण्याची मागणी होत आहे.
शिक्षकांनी निवडले इतर व्यवसाय
8 महिन्यांपासूनचे वेतन थकल्याने संसाराचा गाडा चालविण्यासाठी विनाअनुदानित शिक्षकांनी इतर व्यवसाय करण्यास सुरुवात केली. काहींनी उद्यमबाग येथील कारखान्यांमध्ये नोकरी स्वीकारली तर काही जण सोसायटय़ांची पिग्मी जमा करू लागले आहेत. भाजी विक्री, पेपर टाकणे, दूध विकणे असे पार्टटाईम व्यवसाय करून विद्यादानाचे काम करीत आहेत. त्यामुळे लवकर वेतन देण्याची मागणी करण्यात येत आहे.