तेल विपणन कंपन्यांकडून गॅसधारकांना दिलासा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनाचा संसर्गामुळे ‘लॉकडाऊन’ सुरू असतानाच तेल विपणन कंपन्यांनी गॅसधारकांना मोठा दिलासा दिला आहे. तेल कंपन्यांनी विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 162.50 रुपयांनी कपात करून सुखद धक्का दिला आहे. या दरकपातीमुळे मुंबईतील ग्राहकांना आता गॅस सिलिंडरसाठी केवळ 581.50 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी हा दर 679 रुपये इतका होता. दिल्लीतील ग्राहकांना 744 रुपयांऐवजी 582 रुपयात सिलिंडर उपलब्ध होणार आहे.
तेल कंपन्यांकडून प्रत्येक महिन्याच्या प्रारंभी सुधारित दरांची अंमलबजावणी केली जाते. सर्व कंपन्यांनी घेतलेल्या आढाव्यानंतर यासंबंधी दर निश्चित केले जातात. त्यानुसार शुक्रवारी झालेल्या बैठकीनंतर विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. मागील वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून सातत्याने दरांमध्ये वाढ होत होती. मात्र, जागतिक बाजारातील मंदीच्या पार्श्वभूमीवर मार्च आणि एप्रिलपासून कपातीस प्रारंभ करण्यात आला होता. मागील दोन महिन्यात झालेली कपात किरकोळ असली तरी मे महिन्यापासून गॅसधारकांची तब्बल 162 रुपयांची बचत होणार आहे. त्यामुळे ही दरकपात सर्वात मोठी असल्याचे दिसून येत आहे.
देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मेट्रो शहरांसह अन्यत्रही गॅस सिलिंडरसाठी लोक मोठी गर्दी करत असल्याचे दिसून येत होते. लॉकडाऊन काळात लोक घरातच असल्यामुळे गॅसचा वापरही वाढला होता. त्यातच आता कंपन्यांनी दरकपात केल्यामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे. देशात सध्या प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 12 सिलिंडर अनुदानित किंमतीत वितरित केले जात आहेत.
सिलिंडर विक्रीत 20 टक्के वाढ
लॉकडाऊनच्या काळात एप्रिल महिन्यामध्ये सिलिंडर विक्रीमध्ये 20 टक्के वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने यासंबंधी सविस्तर आकडेवारी जाहीर केली आहे. सध्या देशात मुबलक गॅस उपलब्ध असून टंचाई जाणवणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व गॅस सिलिंडर्सची साठेबाजी करू नये असेही सुचविले आहे.