प्रतिनिधी /सातारा :
सातारा शहरात अंशता लॉकडाउन जारी होताच खरेदी आणि विविध कामांच्या निमित्ताने दुचाकी चारचाकी वाहनातून घराबाहेर पडणाऱया बेफान वाहनचालकांना सातारा पोलिसांनी आज पोवई नाक्यावर आज चांगलाच दे धक्का दिला. विनाकारण फिरणाऱया वाहनचालकांवर जाग्यावरच दंडात्मक कारवाई करून पोलिसांनी त्यांना विनाकारण घराबाहेर पडूच नका, असे आवाहन पोलीस दलाने केले आहे.
जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी सातारा शहरासह जिह्यात 17 ते 22 जुलै दरम्यान पूर्णता लॉकडाऊन जारी केला होता. या काळात सातारा शहर व परिसरात विनाकारण वाहनांमधून फिरणाऱया वाहनचालकांवर मोठय़ा प्रमाणावर दंडात्मक कारवाई केली होती. मात्र, कारवाई करूनही सातारकर वाहनचालकांच्या वर्तनात काही एक फरक पडला नाही.
बुधवारी अंशता लॉकडाउनला सुरुवात होताच सकाळी दहानंतर सातारा शहर व उपनगरातील नागरिक मोठय़ा प्रमाणावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांमधून खरेदी अथवा अन्य कारणांसाठी बाहेर पडले. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास येतात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांसह वाहतूक शाखा व राखीव पोलीस दलाचे कर्मचारी सकाळी 11 वाजता मोठय़ा प्रमाणावर पोवईनाका येथे दाखल झाले. रस्त्यावर आलेल्या प्रत्येक दुचाकी चारचाकी वाहन चालकांची कसून चौकशी सुरु करण्यात आली.
ओळखपत्र, वाहन चालवण्याचा परवाना, वाहनांची कागदपत्रे अचानक तपासण्यात येऊ लागल्यामुळे वाहनचालकांची चांगलीच भंबेरी उडाली. या कारवाईमधून दुचाकीवरुन आलेल्या महिलांना देखील सूट देण्यात आली नाही. दुचाकीवरून विनाकारण महिला फिरत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी महिला पोलिसांना त्याठिकाणी पाचारण केले. महिला पोलिसांनी मग कारवाई सुरु केली. दरम्यान, आवश्यक कारण असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा कारवाई होणारच, असा इशारा पोलीस दलाने दिला आहे.