अजय बन्सल यांची माहिती नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन
प्रतिनिधी/ सातारा
बाधित रूग्णांच्या आकडय़ात चढ-उतार होत आहे. यामुळे सोमवार दि. 5 जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पुन्हा लॉकडाऊनचे कडक निर्बंधलागू केले आहेत. जिह्यात पूर्वीपासूनच आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. या चाचणीत वाढ करून ही बंधनकारक करण्याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधिक्षक अजय बन्सल यांनी केले.
बन्सल म्हणाले, सोमवार ते शुक्रवार या कालावधीत अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता उर्वरित सर्व दुकाने बंद राहणार आहेत. अत्यावश्यक दुकानांसह सेतू, आधार केंद्रे व सीएची कार्यालये, शैक्षणिक साहित्यांची दुकाने(केवळ घरपोच सुविधेसाठी) सकाळी नऊ ते दुपारी दोन यावेळेत सुरू राहणार आहेत. शेतीशी संबंधित सर्व दुकाने आठवडय़ाचे सर्व दिवस दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. जिह्यात लॉकडाऊन लागू झाल्याने शनिवारी तसेच आज रविवार दि. 4 रोजी मार्केट बंद करून प्रशासनाला सहकार्य करावे. जिह्यातील वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग आपली चोख कामगिरी बजावत आहे. पोलीसांकडून ठिकठिकाणी नागरिकांची तपासणी केली जात आहे. शिवाय विनाकारण बाहेर फिरणाऱयांवर कारवाई करण्यात येत आहे. जर असा कोणी पोलीसांना आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.