प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहर परिसरात विनापरवानगी वाढदिवस शुभेच्छा देणारे फ्लेक्स लावल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी पाचजणांवर गुन्हे दाखल केले असून यामध्ये राजकीय लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
सातारा पंचायत समिती कार्यालयाच्या बाहेर विनापरवाना जाहिरात फलक लावल्याप्रकरणी सभापती सरिता संभाजी इंदलकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहराच्या सौंदर्याला बाधा निर्माण होईल अशा प्रकारे मोठय़ा आकाराचे विनापरवाना जाहिरात फलक लावल्या प्रकरणी पोलीस नाईक सुनील कर्णे यांनी तक्रार दाखल दिली. त्यावरून सभापती सरिता संभाजी इंदलकर (रा. कळंबे, ता. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेड फाटा चौक येथे विनापरवाना जाहिरात फलक लावल्या प्रकरणी सातारा पंचायत समितीचे माजी सभापती मिलिंद कदम (रा. जय मल्हार हाउसिंग सोसायटी खेड, ता. सातारा) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनापरवाना जाहिरात फलक लावल्याची तक्रार पोलीस नाईक राहुल खाडे यांनी दिली.
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात विनापरवाना जाहिरात फलक लावल्या प्रकरणी माजी शिक्षण सभापती सतीश नामदेव चव्हाण (रा. महागाव, ता. सातारा) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जाहिरात फलक विनापरवाना लावल्याची तक्रार पोलीस नाईक सुनिलकर्णे यांनी दिली आहे. तपास पोलीस हवालदार भिसे करीत आहेत.
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात विनापरवाना जाहिरात फलक लावल्या प्रकरणी नगरसेवक शेखर राजाराम मोरे (रा. गोडोली, सातारा), अक्षय प्रकाश गवळी (रा. गुरुवार पेठ, सातारा) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विना परवाना जाहिरात फलक लावल्याची तक्रार पोलीस कॉन्स्टेबल सचिन नवघणे यांनी दिली. अधिक तपास पोलीस हवालदार भिसे करत आहेत.