प्रतिनिधी / महाबळेश्वर :
वेण्णालेक जवळच वेण्णा नदीपात्रात अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम करीत असलेल्या एका धनिकास पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी चांगलाच दणका दिला आहे. पालिकेच्या बांधकाम विभागाने इतारतीमध्ये असलेले बांधकाम साहित्य व औजारे जप्त करून बेकादेशीर बांधकाम न करण्याची सक्त ताकिद दिली आहे. मुख्याधिकारी यांच्या या भुमिकेमुळे वेण्णानदी पात्रात विनापरवाना बांधकाम करणारांचे धाबे दणाणले आहेत.
वेण्णालेक जवळच एका धनिकाने नदीपात्रात अतिक्रमण करून विनापरवाना बांधकाम सुरू केले आहे. पालिकेने वेळोवेळी त्याला नोटीसा बजावल्या. मात्र, पालिकेच्या नोटीसांना केराची टोपली दाखवून इतारतीचे बांधकाम सुरू ठेवले. नोटीसला हा धनिक किंमत देत नाही हे पाहुण पालिकेने या मिळकत धारकांवर दोन वेळा गुन्हे दाखल केले. पालिकेचा अडथळा नको म्हणुन या मिळकत धारकाने पालिकेविरोधात न्यायालयात धाव घेवुन स्थगिती आदेश मिळविला आहे. दरम्यान पुन्हा या इमारतीवर चौथ्या मजल्याचे बांधकाम मिळकत धारकाने सुरू केले आहे. स्थगिती आदेश असताना या मिळकत धारकाने पुन्हा इमारत बांधकाम सुरू केल्याने पालिकेच्या मुख्याधिकारी यांनी या मिळकत धारकावर कारवाई करत सर्व बांधकाम साहीत्य व औजारे जप्त केली. त्याचप्रमाणे बांधकाम करू नये अशी सक्त ताकिद दिली आहे.