करमाळा : प्रतिनिधी
डिकसळ ता. इंदापुर ते कोंढार चिंचोली ता.करमाळा या जुन्या रेल्वे लाईन वरील रस्त्याच्या कामात विनापरवाना मुरूम व दगड वापरल्याबद्दल पुणे येथील ठेकेदार मे.शेळके कंस्ट्रक्शन कंपनी (ठेकेदार बबन शेळके) यांना तब्बल ३ कोटी ४ लाख रुपये दंड करमाळा तहसीलदार समीर माने यांनी ठोठावला आहे. एवढा दंड होण्याची ही अलीकडील काळातील पहिलीच घटना आहे.
या प्रकरणी कोंढार चिंचोली येथील माजी सरपंच देविदास सांळुके व राम जयवंत पाडुळे यांनी जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी कुर्डूवाडी यांच्याकडे तक्रारी दाखल करून चार वर्षापासून पाठपुरावा केला होता. सदर प्रकरणी तहसीलदार करमाळा यांनी पाच सुनावन्या घेऊन ठेकेदार शेळके कन्स्ट्रक्शन कंपनी यांना खनिज साहित्य रक्कम रू ६०,८४,०००/चे पाचपट ३ कोटी ४ लाख २हजार रुपये दंड ठोठावला आहे. या रस्त्याचे काम सन २०१० -२०११-२०१२ मध्ये झालेले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकार क्षेत्रात २ फुटापेक्षा जास्त खोदाई करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची पूर्वपरवानगी बंधनकारक आहे.
तशी परवानगी सदर ठेकेदार शेळके यांनी घेतली नसल्याने ५ पट दंडाची आकारणी करमाळा तहसीलदार समीर माने यांनी केलेली आहे. याबाबत श्री. साळुंके म्हणाले की, या कामी आम्ही गेली पाच वर्षापासून कायदेशीर संघर्ष करीत होतो त्यास यश आलेले आहे. भविष्यात तालुक्यात व इतर ठिकाणी अशा स्वरूपाचे अवैध उत्खनन झाल्यास आवाज उठवणार आहोत.