मनपा आरोग्य विभागाची शहापूर खडेबाजार येथे कारवाई : परवाने-नूतनीकरणाकडे व्यावसायिकांचे दुर्लक्ष
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील विनापरवाना व्यावसायिकांप्रमाणेच उपनगर आणि शहापूर खडेबाजार परिसरात विनापरवाना व्यावसायिकांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांच्या नेतृत्वाखाली व्यवसाय परवान्याची तपासणी मोहीम राबविण्यात आली. बहुतांश व्यावसायिकांकडे परवाना नसल्याने त्यांच्याकडून 30 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
विनापरवाना व्यावसायिकांना चाप बसविण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. विविध भागातील व्यावसायिकांकडील व्यवसाय परवान्याची तपासणी करण्यात येत आहे. शहरात हजारो व्यवसाय असताना काही ठराविक व्यावसायिकांनी महापालिकेकडून व्यवसाय परवाने घेतले आहेत. असंख्य व्यावसायिकांनी विनापरवाना व्यवसाय थाटले आहेत. अनेक व्यावसायिकांनी व्यवसाय परवान्याचे नूतनीकरणच केले नाही. त्यामुळे महापालिकेचा महसूल बुडत आहे. शहरातील व्यावसायिकांना परवाने घेण्याची सूचना करण्यात आली होती. पण याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने विविध भागात व्यवसाय परवान्यांची विचारणा करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहापूर भागात व्यवसाय परवाना तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, अनेक व्यावसायिकांकडे व्यवसाय परवाने नसल्याचे आढळून आले. त्यामुळे अशा व्यावसायिकांकडून दंड आकारण्यात आला आहे. शनिवारी दिवसभरात विविध प्रकारच्या विनापरवाना व्यावसायिकांकडून 30 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यावेळी व्यवसाय परवाना विभागाचे कारकून आनंद पिंपरे, स्वच्छता निरीक्षिका शिल्पा कुंभार, सुपरवायझर संजय पाटील, सुभाष घराणे, किरण देमट्टी आदी सहभागी झाले होते.