बेळगाव / प्रतिनिधी
कॅन्टोन्मेंट हद्दीतील व्यवसाय परवाना शुल्कवाढीसाठी आणि नव्या व्यवसायांचा समावेश करण्यासाठी सदस्यांची समिती नियुक्त करून पुढील बैठकीत याबाबत शिक्कामोर्तब करण्याचा निर्णय घेण्यात आला. विनामास्क फिरणाऱयांवर कारवाई करून दि. 1 नोव्हेंबरपासून शंभर रुपये दंड आकारणीचा निर्णय घेण्यात आला.
कॅन्टोन्मेंट बोर्डची सर्वसाधारण बैठक ब्रिगेडियर रोहित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. कोरोना विषाणूंचा प्रसार वाढत असल्याने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे. मात्र, कॅन्टोन्मेंट हद्दीत काही नागरिक विनामास्क फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिका व्याप्तीत विनामास्क फिरणाऱयांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात येत आहे. पण कॅन्टोन्मेंटकडून ही कारवाई करण्यात येत नाही. मात्र, ही कारवाई करण्याबाबतचा विषय बैठकीच्या अजेंडय़ावर घेण्यात आला होता. अडीचशे रुपये दंड वसूल करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, याला सदस्यांनी आक्षेप घेतला. अडीचशे रुपये रक्कम जास्त असल्याने कमी करण्याची सूचना करण्यात आली. त्यामुळे शंभर रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला.
कॅन्टोन्मेंट हद्दीतील व्यवसाय शुल्कवाढ करून 19 वर्षे झाली. या कालावधीत विविध व्यवसायांची भर पडली आहे. त्यामुळे शुल्कवाढीबरोबर व्यवसाय परवान्याचे नूतनीकरण करण्याची गरज आहे. महापालिका प्रशासनाने शुल्कवाढ व विविध नव्या व्यवसायांची यादी तयार केली आहे. या यादीच्या आधारे कॅन्टोन्मेंट बोर्डची यादी तयार करण्याची गरज आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीबर्चस्वा यांनी दिली. महापालिका व्याप्तीत व्यवसाय मोठय़ा प्रमाणात चालतो. त्यामुळे महापालिकेप्रमाणे शुल्क आकारणी करण्यात येऊ नये, अशी सूचना सदस्यांनी केली. याबाबत चर्चा करण्यात आली. शुल्कवाढीबरोबरच व्यवसायांची यादी करण्यासाठी दोन सदस्यांची समिती स्थापन करून प्रस्ताव तयार करावा, असा आदेश ब्रिगेडियर रोहित चौधरी यांनी दिला. हा प्रस्ताव पुढील बैठकीत चर्चेला घेण्यात यावा, अशी सूचना केली.
गोगटे चौकातील उद्यानाचा विकास करण्याच्या मुद्दय़ावर चर्चा करण्यात आली. आमदार निधीअंतर्गत उद्यानाचा विकास करण्यात येणार आहे. याकरिता कॅन्टोन्मेंट बोर्डकडून सहमती देणे आवश्यक आहे. याबाबत कॅन्टोन्मेंटकडून आवश्यक सहकार्य मिळत नसल्याची खंत आमदार अनिल बेनके यांनी व्यक्त केली. त्यामुळे उद्यानाच्या विकासाबरोबरच कॅन्टोन्मेंट हद्दीत विकास राबविण्यास कॅन्टोन्मेंटकडून सहकार्य करण्याची सूचना अध्यक्ष रोहित चौधरी यांनी केली. चौदाव्या वित्त आयोग अनुदानातून विविध विकासकामे राबविण्यासाठी हिरवा कंदील दर्शविण्यात आला.
कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल परिसरात महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्यासाठी मंजुरी देण्यात आली. कॅन्टोन्मेंट हद्दीत असलेल्या स्वच्छतागृहांची स्वच्छता राखली जात नाही. सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे स्वच्छता राखण्यासाठी पे ऍण्ड यूज तत्त्वावर स्वच्छतागृहे देण्यात यावीत. हे देताना कॅन्टोन्मेंट बोर्डला नफा मिळावा हा उद्देश ठेऊ नका. केवळ नागरिकांना चांगली सुविधा मिळावी या उद्देशानेच पे ऍण्ड यूज स्वच्छतागृह सुरू करावे, अशी सूचना अध्यक्ष ब्रिगेडियर रोहित चौधरी यांनी केली. किल्ला भाजी मार्केटमधील गाळय़ांचा दुरुपयोग होत असून, अवैद्य व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे याबाबत आवश्यक कारवाई करण्याची सूचनादेखील आमदार अनिल बेनके यांनी केली.
कॅन्टोन्मेंट हद्दीतील अनधिकृत बांधकामाची माहिती घेण्याची सूचना संरक्षण खात्याने केली आहे. त्याकरिता समितीची स्थापना करण्याची सूचना करण्यात आली आहे. याबाबत सदस्यांनी आक्षेप घेतला. हा विषय अजेंडय़ावर घेण्यात आला नाही. पुरवणी विषयपत्रिकेत असल्याने यावर पुढील बैठकीत चर्चा करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यामुळे अनधिकृत बांधकामाबाबतचा विषय पुढील बैठकीत घेण्याचे ठरले.
यावेळी बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीबर्चस्वा, उपाध्यक्षा निरंजना अष्टेकर, सदस्य डॉ. मदन डोंगरे, विक्रम पुरोहित, अल्लेदिन किल्लेदार, साजिद शेख, अरेबिया धारवाडकर, रिझवान बेपारी आदींसह अधिकारी उपस्थित होते.