अचूक बातमी “तरुण भारत”ची, शुक्रवार 7 डिसेंबर 2022, सकाळी 11.45
● जिल्ह्यात पोलिसांकडून कारवाईची मोहिम
● गेल्या 24 तासात 242 रूग्ण वाढले
● 4123 संशयितांच्या चाचण्या
● पॉझिटिव्हीटी रेट 5.87 कडे
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात कोरोना रूग्णांची वाढ होत असल्याच्या पार्श्वभुमीवर पोलीस दलाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणारांवर थंडावलेली कारवाई पुन्हा वेगाने सुरू झाली आहे. सातारा, कराड, फलटण, वाईसह इतर शहरात नाकाबंदी करून पोलिसांकडून विनामास्क फिरणारांवर कारवाईचा बडगा उगारला जाऊ लागला आहे. दरम्यान जिल्ह्यात कोरोना रूग्णांची वाढ कायम असून शुक्रवारी आलेल्या अहवालात 242 रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. 4 हजार 123 संंशयितांच्या चाचण्या झाल्या आहेत. या आकड्यांवरून पॉझिटिव्हिटी रेट 5.87 पर्यंत पोहचला आहे.
मास्क नसणारांना जागेवरच दंड
सप्टेंबर महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा आलेख घसरला. डिसेंबर 2021 पर्यंत रूग्णवाढीचा आलेख खालीच होता. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांच्यात बिनधास्तपणा होता. कोरोनाची भिती कमी झाल्याने मास्क वापराकडेही दुर्लक्ष होते. मात्र 1 जानेवारीपासून पुन्हा एकदा कोरोना रूग्णवाढीचा आलेख वाढला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणारांवर कारवाईचा बडगा सुरू झाला आहे. जिल्ह्यात पोलिसांकडून नाकाबंदी करत दररोज मास्क न वापरणारांवर कारवाई केली जात आहे.
चाचण्यांची संख्याही वाढली
जिल्ह्यात गेल्या चार महिन्यात कोरोना रूग्णवाढ नियंत्रणात असल्याने साहजिकच चाचण्या करण्याचे प्रमाण दोन हजारांच्या आसपास आले होते. मात्र जानेवारी महिन्यात चाचण्या करणारांचा आलेखही वाढत गेला. शुक्रवारी आलेल्या अहवालात तब्बल 4 हजार 123 संशयितांच्या चाचण्या झाल्या आहेत. सध्याची स्थिती पाहता चाचण्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
गुरुवारी जिल्हय़ात
नमुने-4123
बाधित-178
मृत्यू-00, उशिरा नोंद -00
उपचारार्थ-884
मुक्त-15
गुरुवारपर्यंत जिल्हय़ात
नमुने-23,91,197
बाधित-2,53,113
मृत्यू-6,499
मुक्त-2,45,114