प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना विषाणूची लागण होऊ नये याकरिता फेसमास्क वापरणे बंधनकारक आहे. मात्र अनेक नागरिक विनामास्क फिरत आहेत. यामुळे महापालिकेकडून सोमवारी विविध भागात विनामास्क फिरणाऱया नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. आतापर्यंत 1 लाख 72 हजार रुपये दंड वसूल केला आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत. मात्र नागरिकांकडून खबरदारी घेतली जात नाही. कोरोनाची लागण होऊ नये याकरिता सामाजिक अंतर राखणे, हात स्वच्छ धुणे, तोंडाला मास्क लावणे तसेच व्यवसायिकांनी हॅण्डग्लोज आणि मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. तसेच सभासमारंभ, भव्य विवाहसोहळे आयोजित करण्यावर शासनाने बंदी घातली आहे. तरीही नियमावलींचे पालन काटेकोरपणे केले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. वारंवार सूचना करून देखील अनेक नागरिक विनामास्क फिरत आहेत. बाजारपेठेत फेरीवाले, व्यावसायिक विनामास्क व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले आहे. राज्य शासनाने आगामी वर्षभरासाठी मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. विनामास्क फिरल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना बजावला आहे. त्यामुळे महापालिकेकडून कारवाईची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
यापूर्वी काही ठरावीक भागात ही कारवाई करण्यात येत होती. मात्र आता शहराच्या विविध भागात ही मोहीम राबवून विनामास्क फिरणाऱयांकडून दंड वसूल करण्यात येत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांनी सोमवारी एपीएमसी, नरगुंदकर भावे चौक, शहापूर, वडगाव, रविवारपेठ, काकतीवेस रोड, अशा विविध भागात दंडात्मक कारवाई केली. व नागरिकांना मास्क घालण्यास भाग पाडले. सोमवारी दिवसभरात 7 हजार 800 रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच ही कारवाई राबविण्यास प्रारंभ केल्यापासून आतापर्यंत 1 लाख 72 हजार रुपये दंड वसूल केला आहे.