प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारी थोपविण्यासाठी मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर राखण्यासंदर्भात राज्य सरकारकडून वारंवार सूचना दिल्या जात आहेत. तरीही बाजारपेठेत अनेक जण विनामास्क फिरताना आढळतात. शनिवारी अशा 133 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी शनिवारी रात्री यासंबंधीची माहिती दिली आहे. संपूर्ण शहर व उपनगरात विनामास्क फिरणाऱया 133 जणांवर दंडात्मक कारवाई करून 32 हजार 300 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
गेल्या चार दिवसांपासून नागरी पोलिसांबरोबरच वाहतूक पोलिसांनाही या कामी जुंपण्यात आले आहे. अनेक जण आजही मास्क वापरताना दिसत नाहीत. मास्क असला तरी तो व्यवस्थितपणे घातलेला नसतो. केवळ चेहऱयावर अडकवलेला असतो. अशांवर कारवाई करण्यात येत आहे.
बेळगाव शहर व उपनगरात कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे. रोज दोनशे ते अडीचशेहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. या परिस्थितीत बदल करण्यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर करणे सक्तीचे आहे. याबरोबरच सॅनिटायझर व सामाजिक अंतर आदी नियम पाळणे गरजेचे आहे.
अनलॉक-5 मध्ये अनेक नियम शिथिल करण्यात आले असले तरी कोरोनाचा फैलाव अद्याप कमी झाला नाही. याचा विसर अनेकांना पडल्याचे दिसून येते. म्हणून आता पोलीस दलाच्यावतीनेही दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे.