प्रतिनिधी/ संकेश्वर
कोरोना व्हायरसच्या संकटातून शहराचा बचाव व्हावा, या हेतूने जिल्हाधिकाऱयांकडून आलेल्या आदेशाचे काटेकोर पालन करण्यासाठी संकेश्वर नगरपरिषद व पोलीस खात्याने संयुक्तरित्या मोहीम राबविली आहे. मास्क न वापरणे व रस्त्यावर थुंकणाऱयावर कडक कारवाई करण्यात येत आहे. अशा नियम मोडणाऱया 47 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे विनाकारण फिरणारे वाहनधारक, नियम मोडणाऱयांचे धाबे दणाणले आहेत.
गेल्या तीन दिवसापासून ही कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत 47 जणांकडून दंड आकारण्यात आला असून त्यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपयेप्रमाणे 4700 रुपये दंड वसूल केला आहे. मास्क वापरणे सक्तीचे करण्यासह रस्त्यावर थुंकल्यामुळे संसर्ग वाढू शकतो, त्याची पूर्वदक्षता घेतल्यामुळे शहरातील रस्ते स्वच्छ होण्यासह रोगप्रतिबंधकास मदतीचे ठरणार आहे. अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडा, बाहेर पडताना मास्क वापरा, रस्त्यांवर थुंकू नका असे आवाहन करताना नियम मोडल्याचे आढळल्यास कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
याबरोबरच सध्या होमक्वारंटाईन आणि क्वारंटाईन नागरिकांची तपासणी आरोग्य विभागाकडून वरचेवर सुरू आहे. तसेच तालुका आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. संकेश्वर शहराच्या नजीकच्या खेडय़ांतून येणाऱया मार्गावर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याची अंमलबजावणी काटेकोरपणे सुरू आहे.
मटण, चिकण, अंडी दराने उच्चांकी गाठली
चिकनमुळे कोरोना होतो, असा समज समाजात पसरल्याने कुक्कटपालन व्यवसाय धोक्यात आला होता. यामुळे चिकन व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसला होता. पण आता चिकन खाल्ल्याने काही होत नाही, याचा विश्वास बसल्याने चिकन आणि गावोगावी कोंबडय़ांना मागणी वाढली. दरम्यान संकेश्वर सीलडाऊन होताच आणि पक्ष्यांचा साठा कमी आणि मागणी अधिक यामुळे चिकनचा दर किलोमागे 300 वर पोहचला आहे. तर मटण 600 रुपये व अंडी 6 रुपयाला एक झाले आहे.