ऑनलाईन टीम / सेंटियागो :
चिली देशाच्या राष्ट्राध्यक्षांना तरुणीसोबत सेल्फी घेणे चांगलेच महागात पडले आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी करण्यात आलेल्या नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी चिलीचे राष्ट्राध्यक्ष सेबेस्टियन पिनेरा यांना 3500 डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास 2.57 लाख रुपये दंड भरावा लागला.
पिनेरा यांनी समुद्रकिनाऱ्यावर विना मास्क एका तरुणीसोबत सेल्फी काढला. हा सेल्फी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. त्यानंतर सोशल डिस्टन्स आणि मास्क न लावल्याबद्दल चिलीच्या आरोग्य विभागाने या फोटोवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर त्यांना आरोग्य विभागाने 3500 डॉलर्सचा दंड ठोठावला.
राष्ट्राध्यक्ष पिनेरा यांनी फोटोबद्दल माफीही मागितली होती. मात्र, नियमांनुसार त्यांना हा दंड भरावा लागला. आपल्या घरातून समुद्रावर एकटे फिरायला गेले असताना अचानक एका तरुणीने त्यांच्याजवळ येऊन सेल्फी घेतला. त्याला विरोध करणे खूप अवघड गेले, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.