प्रतिनिधी/ बेळगाव
विनायकनगर येथील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, रस्त्यांचा विकास करावा, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. अखेर येथील रस्त्यांचे भाग्य उजळले असून, रस्त्यांच्या विकासासाठी एक कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रस्त्यांच्या विकासकामाचा शुभारंभ आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आला.
परिसरातील रस्ते खूप खराब झाले असल्याने नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत होते. येथील रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी नागरिकांनी महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. आमदार अनिल बेनके यांच्याकडेदेखील रस्त्यांच्या डांबरीकरणाची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे येथील डांबरीकरणासाठी एक कोटीचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. रस्त्यांच्या डांबरीकरणाबरोबर 40 लाखांचे डेकोरेटिव्ह पथदीप बसविण्यात येणार आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात आला. मार्च महिन्यापर्यंत डांबरीकरणासह डेकोरेटिव्ह लाईट बसविण्याचे काम पूर्ण करण्यात येतील. पाण्याची समस्या व कचऱयासंदर्भात लवकरच कारवाई करण्यात येईल. बुडा कॉलनी येथील जलतरण तलावाचे काम अपूर्ण असून, हे काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे कामदेखील सुरू आहे, अशी माहिती आमदार अनिल बेनके यांनी दिली. रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आल्याने परिसरातील रहिवाशांनी आभार व्यक्त केले. यावेळी डॉ. भुपाल अलकनूर, मारुती नायक, अशोक थोरात, व्ही. एम. पत्तार व विनायकनगर व बुडा कॉलनी परिसरातील रहिवासी उपस्थित होते.