विशाल कदम/ सातारा
सातारा शहरात नियम मोडणाऱयांची संख्या मोठी आहे. पालिका काय आपलीच आहे. जास्तीत जास्त काय करेल नोटीस पाठवले. पुढे काय दंडाचे नोटीस पाठवले, अशा संकल्पनेमुळे शहरातील अनेक बडय़ा बडय़ा मंडळींनी विनापरवाना बांधकामे केली आहेत. त्या बांधकामांप्रकरणी पालिकेने 52,53 च्या नोटीसा बजावल्या. त्या नोटीसा पाठवूनही त्यांनी बांधकाम परवाना घेतला नसल्याने पुन्हा त्यांच्यावर शास्तीची नोटीस बजावली तरीही दंड भरला नाही. अशा अनेक मंडळी साताऱयात असून तब्बल आठ कोटी रुपयांचा दंड गेल्या दहा वर्षात थकीत आहे. तो वसुल करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून काहीच हालचाल नाही.
अगदी स्वतःच्या जागेत जरी बांधकाम करायचे असले तर त्याकरता रितसर परवाना घ्यावा लागतो. त्याकरता नगररचना विभाग आणि पालिकेच्या शहर विकास विभागाकडे प्रस्ताव द्यावा लागतो. त्यांच्याकडून परवानगी मिळल्यानंतर केलेले बांधकाम अधिकृत समजले जाते. परंतु सातारा शहरात बडी बडी मंडळी व काही कार्यकर्तेच आपलीच पालिका आहे या जोशात विना परवाना रेटून बांधकाम करतात. बघू पुढे पालिका काय करते. अधिकाऱयांना सांगू महाराजांचे नाव म्हणून विना परवाना बांधकाम केले जाते. अशी दहा वर्षात अनेक बांधकाम झाली आहेत. प्रत्येक पेठेतल्या गल्लीत डझनाच्यावर नावे आहेत. त्यांना पालिकेच्यावतीने आलेल्या तक्रारीनुसार 52,53 च्या नोटीसा दिल्या गेल्या आहेत. त्या नोटीसानंतर परवाना घेतला नाही तर त्यावर शास्तीची नोटीस देण्यात येते. अशा शास्ती लागलेल्यांची थकबाकी सुमारे 7 कोटी 22 लाख 6 हजार713 रुपयांची थकबाकी आहे. त्यामध्ये डॉक्टर, वकील, व्यावसयिक, पतसंस्था यांच्यासह धार्मिक स्थळांचाही समावेश आहे.
टेबलाखालून दिले की सवलत
पालिकेत काही कर्मचारी टेबलाखालून घेण्यावून एवढे गब्बर झाले आहेत की एकेकाचा फार्म हाऊस, बंगले अगदी पालिकेच्या मिळणाऱया पगारावर कसे झाले असा संशोधनाचा विषय आहे. बांधकाम परवाना घ्यायला आलेल्याकडून कशी बिदागी उकळायची याची मेख त्यांना नेमकी समजली आहे. त्यामुळे टेबलवर माल मिळतो बक्कळ अन् तालही त्यांचा वेगळा असतो, अशी जोरदार चर्चा सुरु आहे.
वसुलीसाठी कोणतीही कार्यवाही नाही
विनापरवाना बांधकाम केलेल्यांच्या दंड वसुल करण्यासाठी पालिकेकडून कोणतीही अशी कार्यवाही होताना दिसत नाही. केवळ नोटीसा बजावण्याचे काम केले जात आहे.
शास्ती झालेली काही मंडळी
माहितीच्या अधिकारात उजेडात आलेला हा प्रकार असून शास्ती झालेल्या काही मंडळी पुढीलप्रमाणे धेंडीराम ज्ञानू खरात यांच्यावर 1 लाख 25 हजार रुपयांचा, सरला महेश घोडके यांच्यावर 62 हजार 899 रुपये, लाल बहादूर शास्त्राr कॉलेज 13 लाख 34 हजार678 रुपये, राजन पोरे यांना 41 हजार 38 रुपयांचा, रशीद मलबारी 43 हजार 443 रुपयांचा, भिकू महाडिक 83 हजार 955 रुपयांचा, मुमताज मोमिन 58 हजार 332 रुपयांचा, शांतिलाल फिरोदीया 4 लाख 63 हजार 232 रुपये, जय भवानी पतसंस्था 1 लाख 57 हजार 833 रुपये, भवरलाल रावतसिंग पुरोहित यांना 1 लाख 13 हजार 841 रुपये, राजेश विश्वनाथ भोसले यांना 83 हजार 833 रुपये, चंद्रकांत सदाशिव जांभळे 80 हजार 379 रुपये, प्राजक्ता दीपक जाधव 96 हजार 878 रुपये, रमेश उत्तेकर 64 हजार 990 रुपये, रेखा साठे यांना 93 हजार 769 रुपये, सजयकुमार जाधव 41 हजार 987 रुपये, एरंडोल रा. सदरबाजार 1 लाख 40 हजार 654 रुपये, फेड्रीक सम्युअल व सौ. शालिनी सम्युअल 3 लाख 76 हजार 513 रुपये, दत्तात्रय बरकडे 91 हजार 368 रुपये, महादेव रामचंद्र धनावडे व सदाशिव रामचंद्र धनावडे यांना 75 हजार 149 रुपये, आनंदा आंदेकर यांना 91 हजार 674 रुपये, कमलाकर माळी 74 हजार 269 रुपये, खलील तांबोळी यांना 47 हजार 599 रुये, मोहित कटारिया 3 लाख 16 हजार 418 रुपये, पार्श्वनाथ पतसंस्था 13 हजार 866 रुपये, संतोष केंजळे 2 लाख 35 हजार, सुशिला फोफळकर 53 हजार 91 रुपये अशी शास्ती केली असून 15 दिवसात भरावी अशी त्या नोटीसात नमूद केले आहे.