व्हीजेडी पद्धतीवर मिळविला विजय; सनथ नेवगी, उदीत यादवच्या चमकदार खेळी
क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
गोव्याच्या 19 वर्षांखालील मुलांच्या संघाने विनू मांकड एकदिवशीय क्रिकेट स्पर्धेतील आपल्या दुसऱया लीग सामन्यात आसामला 4 विकेट्सनी पराभूत केले. काल हा सामना अहमबादेतील गुजरात कॉलेज क्रिकेट ‘अ‘ स्टेडियमवर खेळविण्यात आला.
या सामन्यात गोव्याने नाणेफेक जिंकून आसामला प्रथम फलंदाजी करण्याचे निमंत्रण दिले होते. आसामने आपल्या डावात 45 षटकात 8 बाद 154 धावा केल्या. त्यांच्या रोहन हजारिकाने सर्वाधिक 33 धावा केल्या. गोव्यासाठी उदीत यादवने 21 धावात 4 गडी बाद केले.
या सामन्याला पावासाचा व्यत्यय आल्याने व्हीजेडी पद्धतीवर गोव्याला विजयी घोषित करण्यात आले. यावेळी गोव्याने 31.5 षटकात 6 बाद 129 धावा केल्या होत्या. गोव्यासाठी विजयात मोलाचा वाटा उचलताना सलामीचा फलंदाज सनथ नेवगीने मांकडींग पद्धतीने बाद होण्यापूर्वी 78 चेंडूत 6 चौकार व 1 षटकार खेचून 57 धावा केल्या. आसामच्या परवेझ मुसारफने 16 धावात 2 गडी बाद केले. आता गोव्याचा तिसरा लीग सामना हैदराबादविरूद्ध 1 ऑक्टोबर रोजी होईल.
संक्षिप्त धावफलकः आसाम, 45 षटकात 8 बाद 154 (परवेझ मुसारफ 26, मंजीता डेका 12, रोहन हजारिका 33, धुव बोराह 10, राहुल अगरवल्ला 23 धावा. गोलंदाजीः लकमेश पावणे 3-0-11-0, प्रज्ञेश गावकर 4-1-21-0, कौशल हट्टंगडी 6-0-31-1, उदीत यादव 9-0-21-4, दीप कासवणकर 9-1-28-1, मनीष पै काकोडे 8-0-23-1, आयुष वेर्लेकर 6-0-13-1) पराभूत विरूद्ध गोवा, 31.5 षटकात 6 बाद 129 व्हीजेडी पद्धतीवर (सनथ नेवगी 57, आर्यन नार्वेकर 0, दीप कासवणकर 10, कौशल हट्टंगडी 13, आयुष वेर्लेकर 12, प्रज्ञेश गावकर 2, शिवेंद्र भुजबळ नाबाद 11, शुभम गजीनकर नाबाद 17 धावा. परवेझ मुसारफ 2-16, मायुख हजारिका 1-21, धुव बोराह 1-23).