नवी दिल्ली
भारताची आघाडीची महिला मल्ल विनेश फोगटचे दोन चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले असून यामुळे तिने कोरोनावर मात केल्याचे स्पष्ट झाले. मात्र, खबरदारीची उपाययोजना म्हणून ती आणखी काही कालावधी स्व-विलगीकरणात असेल. स्वतः विनेशने ट्वीट करत ही माहिती दिली. 24 वर्षीय विनेशला यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे व्हर्च्युअल पुरस्कार सोहळय़ात खेलरत्न पुरस्कार स्वीकारण्यासाठी सहभागी होता आले नव्हते.
दरम्यान, विनेशचे व्यक्तिगत प्रशिक्षक वोल्लर ऍकोस हे अद्याप बेल्जियममध्येच असून यामुळे ओम प्रकाश तिला प्रशिक्षण देत होते. ओम प्रकाश स्वतः पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.
त्यांच्याकडून प्रशिक्षण घेत असतानाच विनेशलाही लागण झाली असावी, असा अंदाज आहे. विनेशप्रमाणेच ओम प्रकाश यांनाही यंदाच्या पुरस्कार वितरण सोहळय़ापासून वंचित रहावे लागले. ओम प्रकाश यांची यंदाच्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे.