वर्साव / वृत्तसंस्था
भारताची स्टार महिला मल्ल विनेश फोगटने पोलंड खुल्या कुस्ती स्पर्धेत सुवर्ण जिंकत टोकियो ऑलिम्पिकसाठी आपली योग्य दिशेने तयारी सुरु असल्याची प्रचिती दिली. 53 किलोग्रॅम वजनगटात विनेशने सदर यश प्राप्त केले. तिने अंतिम फेरीत युक्रेनच्या ख्रिस्तिना बेरेझाला 8-0 अशा एकतर्फी फरकाने मात दिली.
विनेश फोगटसाठी या हंगामातील हे तिसरे सुवर्ण असून यापूर्वी मार्चमध्ये मॅटेओ पेलिकोन व एप्रिलमध्ये आशियाई चॅम्पियनशिपमध्ये तिने जेतेपदावर आपली मोहोर उमटवली होती. येथे रंगलेल्या अंतिम लढतीत तिने अगदी एकही गुण न गमावत एकतर्फी विजय संपादन केला. तिने बहुतांशी गुण डबल लेग ऍटॅकवर मिळवत वर्चस्व कायम राखले.
या स्पर्धेत पहिल्या फेरीत तिला रशियाच्या एकतेरिना पोलेश्चूकने झुंजवले. पण, तरीही ही लढत 7-2 अशा फरकाने जिंकल्यानंतर तिला पुढील एकाही लढतीत विजयासाठी विशेष प्रयास करावे लागले नाहीत. अमेरिकेच्या ऍमी ऍन फर्नसाईडविरुद्धची उपांत्य लढत तर तिने अवघ्या 75 सेकंदात जिंकली होती.