नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय जनता पक्षाने आपल्या राष्ट्रीय पदाधिकाऱयांच्या संख्येत वाढ केली आहे. महाराष्ट्रातील नेते आणि राज्यातील माजी मंत्री विनोद तावडे यांची राष्ट्रीय महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली असून महाराष्ट्रातीलच शहजाद पूनावाला यांची राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे.
विनोद तावडे यांच्या राष्ट्रीय महासचिवपदी नियुक्तीचे स्वागत महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी केले. शहजाद पूनावाला हे अनेक हिंदी आणि इंग्रजी वृत्तवाहिन्यांवर भाजपची बाजू समर्थपणे मांडतात. त्यामुळे त्यांची नियुक्ती आता राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून करण्यात आल्याचे महासचिव अरुण सिंग यांनी स्पष्ट केले.
बिहारचे ऋतुराज सिन्हा आणि झारखंडच्या आशा लकडा यांची नियुक्ती राष्ट्रीय सचिव म्हणून करण्यात आली. तर पश्चिम बंगालमधील नेत्या भारती घोष यांची नेमणूक राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून करण्यात आली.
तावडे यांच्या नियुक्तीमुळे पक्षाच्या महासचिवांची संख्या आता 8 झाली आहे. त्यांची नावे अरुण सिंग, कैलाश विजयवर्गीय, दुष्यंत गौतम, डी. पुरंदेश्वरी, सी. टी. रवी, तरुण चुग, विनोद तावडे आणि दिलीप सैकिया अशी आहेत.
ऋतुराज सिन्हा यांनी बिहार भाजपचे पदाधिकारी म्हणून काम केले आहे. ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यसभा सदस्य आर. के. सिन्हा यांचे पुत्र आहेत. तर भारती घोष या पश्चिम बंगालमध्ये भारतीय पोलीस सेवेत अधिकारी होत्या. त्यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता, अशी माहिती देण्यात आली.