गेल्या महिन्यापासून ऑडिट सुरू, संकुलातील कामांमध्ये दिरंगाई, गैरकारभारावर ताशेरे
11 वर्षे उलटली तरीही 80 टक्केच काम पूर्ण, दोषी आढळणाऱ्यांवर खर्चाची जबाबदारी टाकण्याची क्रीडा संघटनांची मागणी
संग्राम काटकर / कोल्हापूर
गैरकारभार, कामात दिरंगाई, ऑडिट करण्यास टाळाटाळ अशा गंभीर आरोपांसह वादग्रस्त ठरलेल्या जलतरण तलावामुळे चर्चेत आलेल्या पद्माळा येथील विभागीय क्रीडा संकुल बांधकामासाठी केलेल्या कामाचे ऑडीट गेल्या महिन्यांपासून सुरु आहे. 2009 पासून 2020 सालापर्यंत क्रीडा संकुल बांधकामाअंतर्गत जी कामे केली त्या कामांचे ऑडीट केले जात आहे. लवकर ऑडीट पूर्ण होईल, असे सुत्रांनी सांगितले आहे. दुसरीकडे ऑडीटमध्ये दोषी आढळणारे अधिकार, कंत्राटदार आणि आर्किटेक्चरांवर क्रीडा संकुल बांधकामासाठी केलेल्या खर्चाची जबाबदारी निश्चित करुन पैसे वसूल केले जावेत, यासाठी आता झगडा करण्याचा पवित्रा शहर राष्ट्रवादी काँग्रेस क्रीडा सेलसह अन्य क्रीडा संघटनांनी घेतला आहे.
क्रीडा संकुलात तयार केलेली विविध खेळांची मैदाने सर्व बाजूंनी सुसज्ज करणे, संकुलाभोवतीने संरक्षण भिंत बांधणे, विद्यूत व्यवस्था, अंतर्गत रस्ते यासह विविध कामात मोठी दिरंगाई झाली आहे. त्यामुळेच 11 वर्षे उलटली तरी कामांचा पहिला टप्पा अपूर्णच आहे. दुसरीकडे कामे अपूर्ण असूनही पूर्ण असल्याचा अहवाल तयार केला आहे. या एकुणच गलथान कारभाराचा क्रीडा संघटना तिव्र शब्दात निषेधही नोंदवला आहे. 25 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दौलत देसाई, राष्ट्रवादी क्रीडा सेलचे शिष्टमंडळ, विभागीय क्रीडा संकुल समितीचे पदाधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत तर क्रीडा संकुलातील निकृष्ट कामांची क्रीडा सेलच्या पदाधिकाऱ्यांनी कडक शब्दात पोलखोल केली होती. सेलचे अध्यक्ष सुहास साळोखे यांनी आक्रमक भूमिका घेत क्रीडा संकुल बांधकामाचे थर्ड पार्टी ऑडिट का होत नाही, संकुलातील खेळांच्या मैदाननिहाय व्हॅल्युएशन न करता संपूर्ण क्रीडा संकुलाचे व्हॅल्युएशन करण्यामागे काय गौडबंगाल आहे, पावणे चार कोटी खर्चुन चुकीच्या जागी तयार केलेल्या जलतरण तलावास जबाबदार कोण यासह अनेक प्रश्न उपस्थित करत विभागीय क्रीडा संकुल समितीला धारेवर धरले होते.
तत्कालीन विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकाऱ्यांनी क्रीडा संकुलातील कामांचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याचे आदेश देऊनही ते आजतागायत का झाले नाही, हा प्रश्न अद्यापही अंधातरीतच आहे. निदान माहितीच्या अधिकाराखाली समोर आलेल्या माहितीकडे तरी गांभिर्याने पाहून 2009 ते 2020 या कालावधीत संकुलातील कामांचे ऑडीट केले जावे, अशी मागणी बैठकीत केली गेली. त्यानुसार जिल्हाधिकाऱयांनी विभागीय क्रीडा संकुल समितीला ऑडीट करवून घेण्यास सांगितले. मात्र 3 महिने उलटले तरी ऑडिटला मुहूर्त मिळालेला नव्हता. दरम्यानच्या काळात ऑडीटसंदर्भात क्रीडा संघटनांनी केलेल्या विचारणेमुळे गेल्या महिन्यापासून ऑडीटला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता लवकरच संकुलातील कामांचे खरे वास्तव उजेडात येणार आहे.
क्रीडा संकुलाच्या कारभारात विभागीय आयुक्तांनीच लक्ष घालावे
विभागीय क्रीडा संकुल उभारणीसाठी शासनाकडून 24 कोटी रुपये टप्प्या-टप्प्याने दिले आहेत. यापैकी 18 कोटी 67 लाख रुपये खर्चुन खेळांच्या मैदानांसह अन्य बांधकामे केली आहेत. मात्र 11 वर्षे उलटूनही बांधकामातील पहिल्या टप्प्यातील कामे 80 टक्केच पूर्ण आहेत. कामेच अपूर्ण असतील तर दुसरा टप्प्यातील कामे कधी होणार हाही मुद्दा आहेच. बांधकामांवर खर्च करुन शिल्लक राहिलेल्या 5 कोटी 33 लाख रुपयांचे काय झाले हेही कळालेले नसल्याने विभागीय आयुक्तांनी क्रीडा संकुलाच्या कारभारात लक्ष घालून दोषींना आरोपीच्या पिंजऱयात उभे करावे.
सुहास साळोखे (शहराध्यक्ष : शहर राष्ट्रवादी काँग्रेस क्रीडा सेल)