कोल्हापूर / प्रतिनिधी
विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातील मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी गुरूवार दि.22 ऑक्टोंबर, 2020 रोजी सकाळी 11 वाजता कोल्हापूर येथील विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या (उच्च शिक्षण) दारातच आढावा बैठकीचे आयोजन केले असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
विभागीय सहसंचालक कार्यालय (उच्च शिक्षण) कोल्हापूर या कार्यालयाच्या कार्यक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये कार्यरत असणारे प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी व शिवाजी विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या विविध तक्रारींचा आढावा घेण्याकरीता या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिक्षण संचालक पुणे यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
शिक्षण सहसंचालक कार्यालयांतर्गत महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची नेमणूका, मान्यता, वेतन निश्चिती, वेतन आयोग, वैद्यकीय बिले, वेतन वितरण, निवृत्ती वेतन यासह अन्य बाबींना अंतिम मंजूरी देण्याचे काम शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून करण्यात येते. परंतू प्रत्यक्षात मात्र शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून अपेक्षीत काम होणे गरजेचे असताना महिनोनमहिने कामे प्रलंबित ठेवणे, पैशांची मागणी करणे, प्रस्ताव सादर करून न घेणे, रजिस्टर नोंद न देणे, प्रस्तावातील कागद गहाळ करणे यासह गंभीर तक्रारी तक्रारदारांच्या असून कार्यालयातील वरिष्ठ जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांचेकडून मनमानी पध्दतीने काम सुरू असून ही बाब गंभीर आहे.
याबाबत निवृत्त प्राचार्य,प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या विविध कर्मचारी संघटनांकडून तक्रारीप्राप्त झाल्या असून यासर्व तक्रारदारांसमवेत शिक्षण सहसंचालक कार्यालयात आढावा बैठक घेणार असून तिन्ही जिल्ह्यातील सर्व तक्रारदारांनी बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.