नागरिकांसह पोलिसांकडून महिलेची चौकशी
प्रतिनिधी /बेळगाव
गोकाक ते बेळगाव या दरम्यान रेल्वेतून प्रवास करणाऱया एका विमनस्क महिलेजवळ गेंडस बाळ सापडले. या महिलेजवळ हे गोंडस बाळ कोठून आले याचा संशय प्रवाशांना आला. त्यांनी तात्काळ रेल्वे पोलिसांशी संपर्क साधत महिला व बाळाची माहिती दिली. त्या महिलेला ताब्यात घेऊन तिला शिवाजीनगर येथील सुधारगृहात पाठविण्यात आले. तर लहान बाळाला चाईल्ड हेल्पलाईनकडे सुपूर्द करण्यात आले. हे बाळ त्या महिलेचेच आहे का, याची चौकशी सध्या पोलीस करीत आहेत.
एका विमनस्क महिलेजवळ गोंडस बाळ दिसून आल्याने प्रवाशांनी त्या महिलेची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. परंतु ती महिला काहीच बोलण्यास तयार नव्हती. अखेर प्रवाशांनी त्या महिलेविषयी रेल्वे पोलिसांना माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. अंगावर व्यवस्थित कपडे नसणाऱया महिलेजवळ इतके सुंदर बाळ कोठून आले याची चौकशी करण्यास त्यांनी सुरुवात केली.
तिच्याजवळ हैदराबाद येथील युनिव्हर्सिटीचे आयकार्ड मिळाले आहे. तर फाटलेल्या स्थितीतील एक फोटो मिळाला आहे. यावरून पोलिसांनी तिची चौकशी सुरू ठेवली आहे. त्या बाळाला चाईल्ड हेल्पलाईनकडे दिले असून महिलेची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. चौकशीअंती ते बाळ कोणाचे आहे, हे समजणार आहे.