उत्तर प्रदेशातील गोरखपूर रेल्वेस्थानकाचा अक्षरशः कायापालट झाला आहे. आता भारतातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म या रेल्वेस्थानकावर आहे. याशिवाय प्रवाशांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. रेल्वेस्थानकावर आता मॉल आणि रुग्णालय स्थापित करण्यासाठी तयारी सुरू आहे.
या रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्मची लांबी 1366.33 मीटर इतकी आहे. यापूर्वी कोलकात्यानजीकचा खरगपूर रेल्वेस्थानकाचा प्लॅटफॉर्म सर्वात लांब मानला जात होता. आता तो विक्रम मोडला गेला आहे. कुठल्याही रेल्वे प्रवाशाला त्याची कोणतीही आवश्यकता पूर्ण करण्यासाठी रेल्वेस्थानकाबाहेर जावे लागू नये, याची दक्षता घेण्यात आली आहे. या स्थानकाचा कायापालट रेलभूमी विकास प्राधिकरण आणि इतर संस्थांनी एकत्रितरीत्या केला आहे. यासाठी पीपीपी मॉडेल उपयोगात आणण्यात आले आहे. अद्यापही स्थानकाचे सुशोभिकरण सुरू असून सगळे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो. गोरखपूरप्रमाणेच गोंडा आणि छाप्रा रेल्वेस्थानकांचाही कायापालट करण्यात येत आहे.