टॅक्सी ट्रकचे काम एप्रिलअखेर पूर्ण होणार
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव विमानतळावर होणाऱया फ्लाईंग टेनिंग ऑर्गनायझेशन (एफटीओ)च्या कामाला गती मिळाली आहे. विमानतळाच्या रनवेपासून एफटीओपर्यंत घालण्यात येणाऱया टॅक्सी ट्रकचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. एप्रिलअखेरपर्यंत टॅक्सी ट्रकचे काम पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
नागरी उड्डाण मंत्रालयाने देशातील 5 विमानतळांवर पायलट प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या 5 विमानतळांमध्ये बेळगावचा समावेश होता. बेळगाव विमानतळावर 2 पायलट प्रशिक्षण केंद्रे होणार आहेत. या दोन केंद्रांसाठी निविदाही मंजूर करण्यात आल्या होत्या. दिल्ली येथील रेडबर्ड व बेंगळूर येथील समवर्धने प्रा. लि. कंपनीला अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. परंतु मध्यंतरी बेळगावमधील एफटीओ हुबळी येथे हलविण्यात आल्याच्या अफवा उठविण्यात आल्या होत्या. यामुळे बेळगावच्या नागरिकांनी याला बराच विरोध केला होता.
प्रत्यक्षात विमानतळाच्या रनवेपासून एफटीओपर्यंत निर्धारित केलेल्या जागेपर्यंत टॅक्सी ट्रक घालण्यात येत आहे. यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. या कामाला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर खडी टाकून टॅक्सी ट्रकच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. याचसोबत एफटीओसाठी हँगर उभारणी करण्याचे काम सुरू आहे. एप्रिल अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.