इतिहासात पहिल्यांदाच उतरले मोठे विमान
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव विमानतळाच्या इतिहासात पहिल्यांदाच 189 आसन क्षमता असणारे विमान सोमवारी उतरले. इतके मोठे बोईंग विमान लॅन्ड होणारे उत्तर कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्रातील पहिले विमानतळ ठरले. यामुळे भविष्यात प्रवासी क्षमतेत वाढ झाल्यास अशी मोठी विमाने बेळगावमध्ये कायम उतरतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
स्पाईसजेट दिल्ली-बेळगाव विमानफेरी दरम्यान 149 आसन क्षमता असणाऱया विमानाचा समावेश असतो. 13 ऑगस्टपासून या फेरीला सुरूवात करण्यात आली असून दररोज 200 हून अधिक प्रवासी ये- जा करीत आहेत. सोमवार व शुक्रवार असे आठवडय़ातून दोन दिवस ही विमानसेवा देण्यात येते. यामुळे प्रवाशांना अवघ्या अडीच तासांमध्ये बेळगावमधून दिल्लीला पोहचता येत आहे. यात लष्करी जवान, उद्योजक, विद्यार्थी, राजकारणी यांचा समावेश अधिक आहे.
सोमवारी स्पाईसने वेळापत्रकात बदल करत विमानातही बदल केला. 189 आसन क्षमता असणारे बोईंग विमान बेळगावला पाठविण्यात आले. पहिल्यांदाच बेळगाव विमानतळावर इतके मोठे बोईंग विमान उतरले. 122 प्रवासी दिल्लीवरून बेळगावला आले तर 155 प्रवासी बेळगावमधून दिल्लीला गेले.