मुंबई-नाशिक येथून येणाऱया प्रवाशांची तपासणी
प्रतिनिधी / बेळगाव
राज्य सरकारच्या आदेशानुसार महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱया प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे. याच्या अंमलबजावणीला बेळगाव विमानतळावरही सुरुवात करण्यात आली आहे. मुंबई व नाशिक या शहरांमधून बेळगावमध्ये दाखल होणाऱया प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग व आरटी-पीसीआर अहवाल तपासले जात आहेत.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून रस्ते, रेल्वे व विमानमार्गे येणाऱया प्रवाशांना निगेटिव्ह अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. विमान ज्या ठिकाणाहून उड्डाण घेते त्याच ठिकाणी त्यांचे अहवाल व तपासणी करूनच त्यांना विमानात प्रवेश देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक प्रवाशाची विमानात प्रवेश करण्यापूर्वी तपासणी केली जात आहे. त्याचसोबत बेळगाव विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांचे थर्मल स्क्रिनिंग केले जात आहे.
विमानतळावर खबरदारी
सध्या महाराष्ट्रातील मुंबई व नाशिक या दोन शहरांमधून विमानसेवा सुरू आहे. या दोन्ही शहरांतून दाखल झालेल्या प्रवाशांची तपासणी करूनच त्यांना प्रवेश देण्यात येत आहे. कोरोनाचा शिरकाव रोखण्यासाठी विमानतळावरदेखील योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.